न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा होणार वापर अभिमानास्पद

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भारुका यांचे उद्गार

देवगड(प्रतिनिधी)
भाषा हे ज्ञान प्राप्त करण्याचे माध्यम आहे. आपण आपल्याच भाषेतून ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा खूप वापर होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा होत असलेला वापर आपल्याला अन्य कोठेही दिसला नाही. ही खरंच अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग- ओरोसचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस जे भारुका यांनी येथे व्यक्त केले.


मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देवगड दिवाणी न्यायायल (क. स्तर) येथे २१ जानेवारी रोजी ‘मराठी भाषा संवर्धन ‘दिन’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. भारुका बोलत होते. व्यासपीठावर देवगड दिवाणी न्यायाधीश एस. बी. वाळके, देवगड वकिल संघटनेचे अध्यक्ष डी. आर. गोरे, ज्येष्ठ विधीज्ञ अविनाश माणगांवकर, तहसीलदार स्वाती देसाई उपस्थित होते. श्री. भारुका पुढे म्हणाले, न्यायालयीन अथवा दैनंदिन कामकाजात भाषेचा वापर जोपर्यंत वाढवत नाही, तोपर्यंत त्याबाबतचे पर्यायी शब्द आपल्याला सापडत नाहीत. आता काळ वि ज्ञानाचा आहे. डिजिटलायझेशनचा आहे. आपण आपली भाषा सोडली, तर भविष्यात या गोष्टीचा आपल्याला त्रास निश्चितच होईल, असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषेतील गोडी, त्याचे व्याकरण, साहित्य हे अप्रतिम आहे. सगळ्याच भाषा चांगल्या असतात. परंतु भाषांचा वापर कमी होत असल्याने त्या कमी प – तिष्ठेच्या बनल्या आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करून आपल्या भाषेचा मान वाढवूया, असे श्री. भारूका यांनी सांगितले.
वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड. गोरे म्हणाले, मराठी भाषेचा उगम संस्कृतमधून झाला आहे. ती पूर्वापार चालत आलेली भाषा आहे. मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे जेणेकरून न्यायालयात समाविष्ट असलेले खटले व त्यावर होणारे निकाल सहजरित्या पक्षकारांना समजतील. सध्या बहुतांश निकाल किंवा न्यायालयाचे आदेश मराठी भाषेत पारीत केले जातात. ही बाब भुषणावह असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी देवगड न्यायालयाच्या कनिष्ठ लिपीक श्रीमती जे. आर. तेंडोलकर यांनी मराठी भाषा पंधरवड्याविषयी माहिती दिली. यावेळी नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकुर, अॅड. पी. व्ही. बोडस, अॅड. अभिषेक गोगटे, अॅड. एल. एम. नाथगोसावी, अॅड. आर. एस. राणे, अॅड. ए. ए. गुमास्ते, अॅड. आरती दामले, विशाल देवगडकर, अॅड. संगीता कालेकर, अॅड. सिद्धी सावंत, अॅड. पाटील, अॅड. साटम यांच्यासह जिल्हा व देवगड न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद, पक्षकार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचलन अँड आरती खाडिलकर यांनी केले.

You cannot copy content of this page