मच्छीमारांचा थकित डिझेल परतावा मिळणार

मत्स्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सोबतच्या बैठकीत निर्णय;पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा
उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांची माहिती

मालवण, दि प्रतिनिधी
केंद्रातील मत्स्य संपदा योजना सक्षमपणे जिल्ह्यात न राबविणे, त्यात आधीच्या सत्ताधाऱ्यांचा राजकीय हस्तक्षेप, डिझेल परतावा न मिळणे, सागर मित्र यांची नेमणूक न करणे, वादळातील मिळालेल्या नुकसान भरपाईत पक्षपात करणे असे प्रकार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी मंत्रालयामध्ये मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बैठक आयोजित केली होती. त्यावेळी डिझेल परतावा वेळेवर न मिळाल्यास सोसायटीचे व मच्छीमारांचे होणारे नुकसान या संदर्भात निलेश राणे यांनी लक्ष वेधले. त्यामुळे भरघोस परतावा व संपूर्ण परतावा द्यावा अशी मागणी केली. त्यानुसार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तत्काळ डिझेल परतावा मंजूर केला असल्याची माहिती भाजप उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.

भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार महाराष्ट्रात आल्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली होती. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्येबाबत लक्ष वेधले होते. त्यानुसार डिझेल परतावा मंजूर करण्यात आला आहे. सोबतच केंद्रातील मत्स्य संपदा योजना जिल्ह्यात सक्षमपणे राबवण्यासाठी सागर मित्र नेमणूक करणे आवश्यक आहे अशी मागणी केली होती. त्या नुसार जिल्ह्यामध्ये दहा सागरमित्रांची नेमणूक कायमस्वरूपी सहाय्यक आयुक्त या पदाची नेमणूकही तत्काळ करण्यात आली आहे. समुद्र गस्तीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून ती कार्यान्वित करण्यात आली आहे.

भाजपा युती सरकार मुळे प्रशासन गतिमान झाले आहे याचीही प्रचिती जनतेला येत आहे. मच्छीमारांच्या प्रश्नाकडे युती सरकार गांभीर्याने पाहत आहे. आघाडी सरकारच्या काळात हक्काचे पैसे भीक मागल्यासारखे मागावे लागत होते. सरकार उपकार करते अशा हमीभावात पक्षपात करून निधी देत होता. याचीच प्रसिद्धी घेण्याचे काम स्थानिक आमदार करत होते. मत्स्य संपदा योजनेतील व चांदा ते बांदा, सिंधू रत्न योजनेतील प्रलंबित प्रस्ताव लवकरात लवकर कार्यवाहीत होण्यासाठी निलेश राणे यांच्यामार्फत भाजपा कार्यरत असून मच्छीमार व मच्छीमार सोसायटीचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच माशांवर प्रक्रिया करणारे उद्योग लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत अशी माहितीही श्री. केनवडेकर यांनी दिली.

डिझेल परताव्यासाठी भरघोस निधी दिल्याबद्दल व सागर मित्रांची नेमणूक केल्याबद्दल मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे पालिकेचे माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, बुथ अध्यक्ष नारायण धुरी, वसंत गावकर यांनी आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page