⚡मालवण ता.१२-:
मालवणात संगीत कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या रोटरी क्लब ऑफ लेक सिटी ठाणे यांच्या सारथी दिव्यांग सेंटरच्या अंध दिव्यांग मुलांनी मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या सदस्यांच्या साथीने वायरी समुद्रकिनारी समुद्राची माहिती घेत आपल्या स्पर्शाच्या जाणीवेतून समुद्र अनुभवला.
रोटरी क्लब ऑफ लेक सिटी ठाणे अंतर्गत अंध दिव्यांग मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या सारथी दिव्यांग सेंटरचा अंध दिव्यांग मुलांचा ऑर्केस्ट्रा ग्रुप सध्या मालवणात दाखल झाला आहे. या मुलांना समुद्र अनुभवता यावा व सागरी जैव विविधतेची माहिती मिळावी या उद्देशाने वायरी येथील पर्यटन व्यावसायिक प्रशांत जोशी यांनी “युथ बिट्स फॉर क्लायमेट”या संस्थेशी संपर्क साधला. वायरी समुद्र किनाऱ्यावर या मुलांनी युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या सदस्यांच्या साथीने समुद्र अनुभवला.
यावेळी संस्थेच्या दुर्गा ठिगळे यांनी समुद्रातील जैवविविधता, मासे, प्रवाळ, समुद्री वनस्पती, खडकाळ भाग, वाळूचे विविध रंग, मालवणच्या समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ला याविषयी मुलांना माहिती दिली. संस्थेचे सदस्य दर्शन वेंगुर्लेकर व इतर सदस्यांनी किनाऱ्यावरील शंख, शिंपले मुलांच्या हातात देऊन त्याविषयी व समुद्राविषयी माहिती दिली. यावेळी मुलांनी किनाऱ्यावर पायांना स्पर्श करणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या स्पर्शातून समुद्र अनुभवला.
यावेळी सारथी दिव्यांग सेंटरच्या ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या व्यवस्थापक सुप्रिया वराडकर, त्यांच्या सहाय्यक प्रिया करंजे, सुहास वराडकर, प्रशांत जोशी, पालक दुर्गा मोहिते, युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या अध्यक्षा मेगल डिसोजा, उपाध्यक्ष स्वाती पारकर, सदस्य दुर्गा ठिगळे, चारुशीला देऊलकर, कमल बांदकर, मनीषा पारकर, राहुल जाधव, भूषण मेतर आदी उपस्थित होते.

