⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे सुमारे वीस लाखाच्या दागिन्यांची धाडसी चोरी प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व त्यांच्या पथकाने मोठ्या शिताफिने चोरीचा गुन्हा उघड करीत संबंधित संशयीत महिलेस ताब्यात घेतले होते. दरम्यान संबंधित
संशयित मार्टिना डुमिन लुद्रिक (वय २७ वर्षे, रा. दाभोली मोबारवाडी, ता. वेंगुर्ला) हिची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक वाय. एन. कांबळे यांनी तपास करीत संबंधित संशयितास ताब्यात घेत वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता तिला सुरुवातीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तदनंतर उशिरा तिची जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली मोबारवाडी येथे १९ लाख ७२ हजार
रु. किमतीच्या दागिन्यांची धाडसी चोरी उघडकीस आली होती. यामध्ये ५७५ ग्रॅम सोने ( डायमंड चे डिझाईन असलेले) सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. ही घटना दि. १८ जून रोजी दुपारी १२.३० ते २१ सप्टेंबर या कालावधीत घडली असल्याबाबतची सलोनी सुधीर लोलयेकर (वय ७२, मूळ रा. दाभोली मोबारवाडी, ता. वेंगुर्ला) ( सध्या रा. मुंबई) यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या धाडसी चोरीत १९ लाख ,७२ हजार रुपये एकूण किमतीचा ५१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व त्यांना डायमंड बसवलेले चोरीस गेले होते. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जिल्ह्याचे कार्यतत्पर
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम व अन्य महत्वाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय. एन. कांबळे, पोलीस हवालदार योगेश सराफदार, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, पो.कॉ. जयेश सरमळकर, पो. कॉ. सिंधू मोंगल आदी पोलीस पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान
सिंधुदुर्ग व वेंगुर्ला पोलिसांच्या या धडक कामगिरीचे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विशेष कौतुक होत आहे.

