⚡मालवण ता.१८-: ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या राष्ट्रीय संघटनेच्या मुंबई अधिवेशना निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक एम्प्लॉइज संघटनेच्या वतीने दि. २१ व २२ जानेवारी या सलग दोन दिवशी ग्राहकांसाठी व सर्व नागरिकासाठी आर्थिक साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाची रॅली २१ रोजी खारेपाटण, वैभववाडी, तळेरे, नांदगाव, शिरगाव मार्गे देवगड व दुपारच्या सत्रात मिठबाव, आचरा मार्गे मालवणला येईल तर २२ रोजी म्हापण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ मार्गे कणकवली येथे येऊन समारोप होणार आहे.
या आर्थिक साक्षरता अभियानाद्वारे नागरिक व ग्राहकाना बँकिंग व वित्त विषयक विस्तृत माहिती देणे. तसेच बँक खाजगीकरणामुळे भविष्यात सर्वसामान्य नागरिकांना उद्भभवणारे धोके या अभियानातून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहचविण्याचा संघटनेचा प्रयत्न आहे. प्रसिद्धीपत्रके वाटून तसेच बँकांचे खाजगीकरण विरोधी जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानास महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष नंदकुमार चव्हाण, उपाध्यक्ष बाळकृष्ण सावंत, सहसचिव महेंद्र प्रभुलकर, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन कोल्हापूरचे अध्यक्ष संतोष रानडे, सहसचिव सुनील दळवी, बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे चे सहसचिव निखिल साटम आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या आर्थिक साक्षरता अभियानात नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज असोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
