Headlines

वराड- सोनवणे पुलाचे काम सुरू न झाल्यास नदी पात्रात उपोषण

ग्रामस्थांचा इशारा

⚡मालवण ता.०८-: मालवण आणि कुडाळ तालुक्याला जोडणाऱ्या कर्ली नदीवर बांधण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षीत वराड – सोनवडे पुलाचे काम चार वर्षे होत आली तरी पूर्ण झालेले नसल्याने आज वराडच्या सरपंच सौ. शलाका रावले यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच, सोनवडे ग्रामस्थ यांनी पुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कामाच्या ठिकाणी कोणीही कामगार आढळून न आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वराड- सोनवडे पुलाचे उर्वरीत काम युद्धपातळीवर सुरु न झाल्यास २६ जानेवारीला वराड आणि सोनवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रखडलेल्या कामाच्या ठिकाणी कर्ली नदीपात्रातच उपोषणास बसणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

दि.१९ ऑक्टोबर २०१८ रोजी पासून वराड सोनवडे पुलाच्या कामाचा कार्यारंभ आदेश असून, त्यानंतर हा पुल १८ एप्रिल २०२० रोजी बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप फक्त ६०% च काम पूर्ण झाले असून अंदाजे ४०% काम अजूनही शिल्लक आहे. त्यामुळे काम सुरू होऊन चार वर्षे पूर्ण झाली तरी पुलाचे काम अपुर्णावस्थेत असल्याने आज काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने आज ग्रामस्थांनी कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी सरपंच सौ. शलाका रावले यांच्यासह प्रमोद धुरी, बबन पांचाळ तसेच वराड, सोनवडे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कोणतेही काम सुरू नसून ना कामगार ना बांधकाम साहित्य अशी परिस्थिती निदर्शनास आली. यावेळी वराड सरपंच सौ. शलाका रावले यांनी रखडलेल्या वराड – सोनवडे पुलाच्या रखडलेल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. तर ग्रामस्थांनी आक्रमक होत पुलाच्या ठिकाणीच सभा घेत तीव्र आंदोलनाचा निर्णय घेतला. येत्या २६ जानेवारीपुर्वी वराड सोनवडे पुलाचे उर्वरीत काम युद्धपातळीवर सुरु न झाल्यास २६ जानेवारीला वराड आणि सोनवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रखडलेल्या कामाच्या ठिकाणी कर्ली नदी पात्रात उपोषणास बसणार, असा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला.

You cannot copy content of this page