भंडारी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या तासिका तत्त्वावरील ‘त्या’ शिक्षकांचे ७ वर्षांचे पगार अद्यापही थकीत

⚡मालवण ता.०८-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील तासिका तत्त्वावरील तीन शिक्षकांचा २०१४- १५ ते २०२०-२१ असा सात वर्षांचा सुमारे ५० हजार रुपये थकीत पगार शिक्षण विभागाने अद्यापही जमा केलेला नाही. याबाबत गेली सात वर्षे शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणारे भंडारी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी याबाबत राज्याच्या शिक्षण आयुक्तांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत थकीत पगार देण्यास अडवणूक कशासाठी केली जात आहे असा सवाल करत तिन्ही शिक्षकांचे पगार देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

भंडारी हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये तासिका तत्वावर काम करणाऱ्या तीन शिक्षकांच्या पगाराचे प्रस्ताव २०१४- १५ साला पासून शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आले. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागातील वेतन पथकाची स्थिती चिंताजनक आहे. शिक्षण विभागाकडून किंबहुना वेतन पथकाकडून सुशिक्षित लोकांचा छळ होत आहे. पगाराच्या प्रस्तावांना अनेक दिवस हात लावला जात नाही. तसेच सातत्याने प्रस्तावात चुका दाखविण्याचा सपाटा लावला जातो. याबाबत जिल्हा शिक्षणधिकाऱ्यांना पत्र लिहिल्यावर हे प्रस्ताव मंजुरीसाठी कोल्हापूर येथील उपसंचालकांकडे पाठविण्यात आले. शिक्षण विभागातील कर्मचारी सात वर्षे पगाराविना राहू शकतील का ? तासिका तत्त्वावरील तीन शिक्षकांचा पगार सात वर्षे थकीत असून ही अडवणूक कशासाठी होत आहे ? असे सवाल विजय पाटकर यांनी करत तिन्ही शिक्षकांच्या थकीत पगाराची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.

You cannot copy content of this page