काका कुडाळकर ; अधिकारी, ठेकेदाराच्या संगनमताने काम सुरू झाल्याचा आरोप, लेखी माहिती देण्याची सा. बां. कडे मागणी…
⚡मालवण, ता.०८-: मालवण तालुक्यातील बिळवस आंगणेवाडी व चौके आंबडोस या रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रियाच न होता त्या कामांना सुरवात करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याचे लक्ष वेधत याची लेखी माहिती द्यावी अशी लेखी मागणी केली आहे.
तालुक्यातील बिळवस आंगणेवाडी या १ कोटी ४९ लाख ६१ हजार रुपये खर्चाच्या तर चौके आंबडोस या ३ कोटी ९ लाख ९६ हजार रुपये खर्चाच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदेची जाहिरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे. प्रत्यक्षात या दोन्ही कामांना सुरवात झाल्याचे निदर्शनास आल्याचे श्री. कुडाळकर यांनी सांगितले.
ही बाब निदर्शनास येताच त्यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचे त्यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले. यात या दोन्ही कामांची निविदा प्रसिद्ध होण्यापूर्वीच ही कामे सुरू करण्यामागे हेतू काय? निविदा प्रक्रिया पूर्ण न होताच एकाच ठेकेदारास काम सुरू करण्याचे आदेश कसे काय देण्यात आले? यावरून ही कामे अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने सुरू झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व भ्रष्टाचारास चालना देणारी आहे. त्यामुळे याबाबतची लेखी माहिती देण्यात यावी अशी मागणी श्री. कुडाळकर यांनी केली आहे.
