जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद अभियंत्यांनी दिली भेट
बांदा ता.३१-:
बांदा आळवाडी येथील तेरेखोल नदीपात्रावरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाची पाहणी आज जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या मुख्य अभियांत्यांनी केली. यावेळी बांदा व शेर्ले गावातील लोकप्रतिनिधिनी जोपर्यंत जोड रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत जलवाहिनीचे काम करू देणार नसल्याचा इशारा दिला. यावेळी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता श्री आवटी यांनी दिले.
सासोली (ता. दोडामार्ग) ते वेंगुर्ले येथे जीवन प्राधिकरण विभागाच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. ही जलवाहिनी बांदा शेर्ले, मडुरा मार्गे प्रस्तावित आहे. आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रावर जलवाहिनीसाठी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र पुलाच्या जोड रस्त्याचे काम न केल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला होता. यासंदर्भात काम लवकर सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता श्री आवटी, सावंतवाडी विभागाचे श्री टेमकर, जीवन प्राधिकरण विभागाचे प्रतिनिधी अमेय शंभुशेट यांनी आज सकाळी पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, सदस्य बाळू सावंत, श्रेया केसरकर, राकेश केसरकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, लक्ष्मण जाधव, विश्राम जाधव, दीपक गोवेकर, तात्या पावसकर आदी उपस्थित होते.
या मार्गावर वाहतुकीची वर्दळ ही मोठ्या संख्येने असल्याने याठिकाणी पुलाच्या जोड रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे व त्यानंतरच जलवाहिनीच्या कामास प्रारंभ करावा अशी मागणी लोकप्रतिनिधिनी केली. अन्यथा काम करू देण्यास विरोध करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी तात्काळ याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना जीवन प्राधिकरण विभागाला दिल्यात. तसेच पावसाळ्यात पुराच्या पाण्याची शक्यता लक्षात घेऊन मातीचा भराव काळ्या दगडाचा थर देऊन भक्कम करावा अशी मागणी करण्यात आली.
