मुलांचं भविष्य संस्कारक्षम आणि बालपण समृद्ध बनवा

वैशाली राजमाने;फोंडाघाटच्या लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

⚡कणकवली ता.२२-: मुलं- विद्यार्थी आणि पालक यांच्यातील नातं नेहमी सौदार्याचे असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पालकांना चुकीचे ठरवण्याची पाळी मुलांवर येणार नाही, याची काळजी घेऊन मुलांचे बालपण समृद्ध करा. संस्थेने सुद्धा मोबाईल आणि टीव्हीच्या आहारी जाणाऱ्या मुलांना अभ्यासाकडे वळविण्यासाठी संस्कारक्षम उपक्रम राबवावेत. आई-वडील अथवा वडीलधाऱ्यांच्या विषयी कृतज्ञताभाव, नम्रतेची सवय जोपासावी. मुलांचे भविष्य उज्वल करावे.असे आवाहनात्मक मार्गदर्शन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी करताना, विद्यार्थी- पालक आणि संस्थाचालकांशी संवाद साधला. लिटिल फ्लावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या सातव्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांवर स्वागतपर पुष्पवृष्टीने झाली. राष्ट्रगीतानंतर, सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष सुभाष सावंत यांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. प्रास्ताविक गौरी गावकर यांनी तर स्वागत आणि अहवाल वाचन प्राचार्य विनया लिंग्रस यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष सावंत, सचिन तायशेटे, सचिव शेखर लिंग्रस, खजिनदार आनंद मर्ये, संचालक रंजन नेरूरकर, संजय आग्रे, महेश सावंत, संदेश पटेल, बबन पवार,मुख्याध्यापक सावंत, कॉलेज प्राचार्य फुलझेले, नवनिर्वाचित सरपंच संजना आग्रे, तलाठी अरुणा जयानावर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
प्रत्येक बालपणाचे वेगळेपण वेगळं असते. त्यामुळे त्यांचेवर पालकांनी कोणतीही गोष्ट लादण्याचा प्रयत्न करू नका. कारण प्रत्येक मुल वेगवेगळे असते. त्याचा बुद्ध्यांक वेगवेगळा असतो. मुलं घडवताना त्यांचे पालकही घडत असतात. चुका मधून सुधारत असतात. मुलांच्या नजरेतून आपण चुकीचे ठरत तर ठरत नाही ना, याचा विचार करून मुलाचं बालपण जपा. असे प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी सांगितले.

यावेळी मुलांना विशेष प्राविण्याबद्दल मान्यवरांचे हस्ते मेडल्स व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. सजग पालकांचेही भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. यानंतर झालेल्या मुलांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाला काही वेळ उपस्थित राहून श्रीमती राजमाने यांनी आनंद घेतला. उपक्रमासाठी सहशिक्षिका निलाक्षि चव्हाण, करुणा चिंदरकर,गौरी गावकर, रिया भिसे, दुर्वा पाटकर आणि उर्मिला कुशे यांनी सहकार्य केले. पालकांनीही स्नेहसंमेलनाला बहुसंख्येने उपस्थित राहून मुलांचे आणि स्टाफचे कौतुक केले.

You cannot copy content of this page