आम. नितेश राणे;केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार..?
⚡कणकवली ता.१४-: ज्या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये ३० ते ३२ हजार मतांनी निवडून आलो. त्या मतदारसंघात अधिकारवाणीने बोलणं हे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझा हक्क आहे.नांदगाव येथील सभेत मी योग्य तेच बोललो आहे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर ठाकरे सेनेचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास कसा होणार? गावात निधी कसा येणार याचं उत्तर आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी द्यावे, असे खुले आव्हान आम. नितेश राणे यांनी दिले. विकासाची धमक आणि राजकीय उंची आमच्याकडे आहे त्यामुळे निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींपैकी 250 पेक्षा जास्त ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात असतील असेही ते म्हणाले.या जिल्ह्यात राणे विरोधक म्हणूनच खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची ओळख असल्याचा टोला आम.नितेश राणे लगावला आहे.
कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आम.नितेश राणे बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत उपस्थित होते.
आम.नितेश राणे म्हणाले, कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेशी माझं अतुट नातं आहे. मी या मतदारसंघाचा पालक आहे. त्यामुळे मला अधिकारवाणीनं बोलायच हक्क आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कणकवली नगरपंचायतीला निधी दिला नाही. मी सुचविलेली कामे डावलली त्यावेळी नाईक, उपरकर गप्प का राहिले? आज देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ज्या पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत सरपंच आणि उमेदवारांना तुम्ही जर मतदान केलं नाहीत. तर नेमका तुमच्या गावाचा विकास कसा होणार याचं विश्लेषण माझ्या विरोधात बोलत असणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी द्यावं. गावाचा विकास झालाच पाहिजे अशी भावना मतदारांमध्ये आहे. तो करून घेण्यासाठी मतदार १८ रोजी मतदान होणार आहे. ज्याचं पॅनल, उमेदवार निवडून येतील त्यांनी गावाचे प्रश्न रस्ते, पाणी, वीज, राज्य सरकारचा निधी, केंद्र सरकारचा निधी आणाव्यात. अशी भावना मतदारांची असते, म्हणून ते पॅनेल निवडून देतात. उद्या त्यांनी ठाकरे सेनेचा सरपंच निवडून दिला. तर मला प्रश्न विचारायचा आहे की, ठाकरे सेना पुरस्कृत पॅनेलचा सरपंच निवडून दिलात तर तुमच्याकडे निधी कसा येणार? नांदगाव येथील प्रचार सभेतील माझा मुद्दा राज्यभर अतिशय योग्य पद्धतीने पोचवल्याबद्दल प्रसार माध्यमांचे मी आभार मानतो. अशा पद्धतीने अदृश्य मित्र असल्याने आमच्यासाठी काम सोपं होते. जो मुद्दा मी नांदगाव येथे मांडला. तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. ज्या मतदारसंघामध्ये ३० ते ३२ हजार मतांनी निवडून आलो. त्या मतदारसंघात अधिकारवाणीने बोलणं हे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझा हक्क आहे. माझा तो हक्क बजावताना काही गोष्टीची लोकांना जाणीव करून देत असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही. मी जे बोललो ते मतदारसंघाचा पालक म्हणून बोलण्याचा माझा अधिकार आहे, मतदारांना कशापद्धतीने समजावयचे असते हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. माझ्या आणि मतदारसंघाच्या नात्यामध्ये कोणीही ढवळाढवळ करू नये. माझ्या वक्तव्याबाबत मतदारांमध्ये आणि मलाही काही चुकीचं वाटलं नाही. जे काही माझे विरोधक आहेत, मिडीयामध्ये जे शुभचिंतक मित्र आहेत, त्यांना अगर ते चुकीचे वाटलं असेल तर तो त्यांच्या मनोरंजनाचा भाग झालेला आहे,असे आ. नीतेश राणे सागितलं. माझ्यामुळे कुणाला प्रसिद्धी मिळत असेल कुणाला पत्रकार परिषद घेण्याची संधी मिळत असेल. कुणाला आपल्या मालकांकडून वाहवा मिळत असेल तर मी समाधानी आहे. श्री.राणे म्हणाले, खास.विनायक रा्ऊत हे केंद्रात विरोधक आहेत. कुठलीही केंद्राची योजना अथवा निधी ते आणू शकत नाहीत. आमदार वैभव नाईक हे विरोधात आहेत. गेल्या साडे पाच महिन्यात आमदार नाईक हे आपल्या मतदारसंघामध्ये एक रूपयाचा तरी निधी आणू शकले आहेत का? याचं उत्तर त्यांनी त्यावं. ग्रामपंचायतींना ग्रामविकास मंत्रालयामार्फत निधी येतो. या खात्याचे मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे आहेत. गाव आणि शहरांना जोडणारे रस्ते बांधकाम खात्याकडून होतात. हे खातं रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. तर सर्व निधी अर्थमंत्रालयाच्या माध्यमातून पाठवला जातो. हे खातं देखील भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे उमेदवार निधी आणूच शकत नाहीत,असा टोला नीतेश राणे यांनी लगावला. पनवेल ते सिंधुदुर्ग पर्यंत भाजप पक्षाचा मी एकमेव आमदार आहे. त्यामुळे माझ्या पक्षाचे नेते माझ्या मतदारसंघावर अन्याय करणार का? मी दिलेली कामांची यादी नाकारणार का? मी एकमेव भाजपचा आमदार असेल तर मी माझ्या पक्षाचा लाडका नाही का? पक्ष माझे लाड करणार नाही का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांचे शिवसेनेत असल्यापासून घनिष्ठ संबंध आहेत. ते राणेंच्या मुलाच्या मतदारसंघाला कधीही डावलणार नाहीत. माझ्या एका शब्दाखातर त्यांनी कणकवली नगरपंचायतीला २२ कोटी रूपये दिले. हे मीच आणू शकलो. म्हणून हक्काने बोलण्याचा अधिकार मला आहे. याची जाणीव मी माझ्या मतदारांना करून देत असेल तर त्यात चुकीचं काहीही नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री असतानाचा कालावधीत कणकवली मतदारसंघावर महाविकास आघाडीने प्रचंड अन्याय केला. साकव यादी स्वीकारली नाही. रस्ते यादी पाठवली त्याला मंजूरी नाही. मी जिल्हा नियोजनमध्ये नेहमी भांडायचो. पण मी पाठवलेल्या याद्या बदलून टाकायचे. ज्या ज्या नगरपंचायती माझ्याकडे होत्या, त्या नगरपंचायतीसाठी निधी दिला नाही. नीतेश राणेचा मतदारसंघ म्हणून निधी दिला जात नव्हता. त्यावेळी परशुराम उपरकर, वैभव नाईक यांचा चुकीचं काही वाटलं नाही. तेव्हा त्यांनी उठाव का केला नाही,असा सवाल आ. नीतेश राणे यांनी केला. मी केलेले वक्तव्य काहीही चुकीचे नाही.माझे मतदारांबरोबर अतुट नाते आहे. आमदार चुकत असतील तर ते जरूर सांगतात. मी हक्काने ते वक्तव्य केलेले आहे. जे माझ्याकडे ग्रामपंचायती देतील त्या ग्रामपंचायतींच्या विकासाची जबाबदारी माझी आहे. बिनविरोध झालेल्या गावांना मी ५० लाख रूपयांचा निधी देणार आहे. ज्यांच्याकडे विकास करण्याची धमक आहे, त्यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी उभं राहावे असे आवाहन आ. नीतेश राणे यांनी यांनी केले. परशुराम उपरकर यांच्या मनसेची जिल्हा कार्यकारणी बरखास्त झालेली आहे त्यामुळे त्यांनी निदान स्वतःचे पद कसे वाचेल याचा विचार करावा. उपरकर यांच्या भूमिकेशी आम्हाला देणे घेणे नाही. आम्ही राज ठाकरे यांच्याशी बोलू असेही ते म्हणाले.
