स्केटिंग यात्रेचे बांदा येथे जोरदार स्वागत

श्रीनगर ते कन्याकुमारी निघालेल्या यात्रेचे जिल्ह्यात आगमन

बांदा/प्रतिनिधी
भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त वाराणसी येथील राजेश डोगरा रोलर स्केटिंग अकादमीतर्फे श्रीनगर ते कन्याकुमारी अशा ५ हजार किमी प्रवासाला निघालेल्या स्केटींग यात्रेचे आज बांद्यात आगमन झाल्यानंतर ढोल पथक व लेझीम पथकाच्या गजरात स्वागत करण्यात आले.


काश्मिर येथील श्रीनगर येथून सुरू झालेली ही यात्रा गेल्या ६७ दिवसांत ३ हजार ६०० कि.मी.चा प्रवास करत रविवारी येथे दाखल झाली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ असा नारा घेऊन सुरू झालेल्या या यात्रेत १ लाख वृक्षारोपण, कुपोषण व रक्तक्षयबद्दल जनजागृती, जागो ग्राहक जागो अशा अनेक पैलूवर काम करत मार्गक्रमण करत असलेल्या या यात्रेचा आतापर्यंतचा ७५ टक्के प्रवास पूर्ण झाला आहे. एकूण १३ राज्ये, १०० शहरे व १० हजार गावातून ही यात्रा प्रवास करणार आहेत. काश्मीर राज्यातील लाल चौकातून निघालेली ही यात्रा २५ डिसेंबर रोजी कन्याकुमारी येथे पाहोचणार आहेत.


येथील स्वागतप्रसंगी बोलताना या यात्रेच्या प्रमुख सोनी चौरसिया यांनी भावुक होत ही यात्रा म्हणजे आम्हाला परिपूर्णतेकडे नेत असल्याचे सांगितले. आम्ही वाराणसी सोडताना एक परिवार सोडला, पण आज भारतभर आमचा परिवार तयार झाला आहे. जीवनात चढउतार असतात. तसाच आमचा हा प्रवास चालू आहे. ऊन, थंडी, चढ, उतार या सगळ्यावर मात स्केटींग यात्रेत अकरा महिला सहभागी झाल्या आहेत.


सोनी चौरसिया या स्वतः गिनीज रेकॉर्ड होल्डर आहेत. १२५ तास ५ मिनिटे कथ्थक करण्याच्या विक्रमाची त्यांच्या नावावर नोंद आहे. कथ्थक व संतूरमध्ये त्यांनी पदवुत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकारी राधा पालं, मनशी रॉय, अंकिता शर्मा, आदिती यादव, निरू डोगरा, सुप्रिया सिंग, पुष्पा भारती, हेमा ओझा, मधु चौरसिया, कार्तिकय विवेक डोगरा, संकेत डोगरा, प्रकाश कुमार हे प्रत्यक्ष स्केटिंग करत आहेत तर २ दुचाकीवरून या टीमला त्यांचे मार्गदर्शक राजेश डोगरा व अन्य तिघेजण एस्कॉर्ट करीत आहेत.


यावेळी सेवानिवृत्त शिक्षक सुभाष गोवेकर, कमलाकर धुरी, बांदा केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, अजय महाजन, सिद्धेश गाड यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर ढोल पथक व लेझीम पथकच्या गजरात रॅलीची बांदा शहरातून मिरवणूक काढण्यात आली. बांदा केंद्रशाळेत रॅलीचे संयोजक सोनी चौरसिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी महाराष्ट्र जर्नलिस्ट फौंडेशनचे राजीव लोहार, व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्षा श्रद्धा नार्वेकर, पतंजली योग समितीचे विकास केरकर, लक्ष्मण पावसकर, गीतांजली गर्दे, सुदन केसरकर, मुख्याध्यापिका सरोज नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे डी पाटील यांनी केले.

You cannot copy content of this page