आंगणेवाडी भराडी देवीचे राज ठाकरे यांनी घेतले दर्शन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण भेटीवर आलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आंगणेवाडी येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यापूर्वी आंगणेवाडीच्या जत्रेला येत असल्याने त्यावेळी पूर्ण मंदिर पाहता येत नाही, मात्र आज मोकळेपणाने मंदिर बघता आले, अशी भावना यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोकण दौऱ्यावर असलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे काल मालवणात आगमन झाल्यावर मनसे कार्यकर्त्यांनी चौके व कुंभारमाठ येथे जल्लोष स्वागत केले होते. यानंतर काल रात्री राज ठाकरे देवबाग येथील हॉटेल विंडमिल येथे वास्तव्यास होते. आज सकाळी ११ वाजता देवबाग येथून ते आंगणेवाडी येथे श्री देवी भराडीच्या दर्शनास निघाले. या दरम्यान मालवण शहरात भरड नाका येथे मालवणातील भाजप पदाधिकाऱ्यांतर्फे राज ठाकरे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर नंतर बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयासमोर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.

दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आंगणेवाडी येथे मंदिर परिसरात दाखल झाल्यावर राज ठाकरे यांचे आंगणे कुटुंबीय व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी मंदिरात श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, राज्य सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर, धीरज परब यांच्यासह मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, मालवण शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे तालुकाध्यक्ष संदिप लाड आदी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर मंदिर परिसरात काही काळ थांबत राज ठाकरे यांनी मंदिर व परिसराची पाहणी केली. यावेळी राज ठाकरे यांनी आंगणे मंडळींशी संवादही साधला. भराडी देवीच्या जत्रेला आपण येतो, तेव्हा गर्दीत व मंडप व्यवस्थेमुळे मंदिर पूर्ण पाहता येत नाही, मात्र आज खुल्या वातावरणात मंदिर पाहता आले, अशी भावना यावेळी राज ठाकरे यांनी आंगणे मंडळींशी बोलताना व्यक्त केली. आंगणेवाडीच्या भेटीनंतर राज ठाकरे हे कणकवलीला रवाना झाले.

You cannot copy content of this page