राणे यांना डीवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देऊ : सुदेश आचरेकर
⚡मालवण ता.२६-: शिवसेनेतील एक – दोन नव्हे तर तब्बल ४० आमदार हे उद्धव ठाकरे यांना सोडून गेले, यातूनच ठाकरे हे आमदारांशी जुळवून घेण्यास अकार्यक्षम ठरले आहेतच त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल आमदारांमध्ये किती असंतोष होता हे सिद्ध होत असल्याने सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेचे प्रबोधन केल्यास ते महत्वाचे ठरेल. अशी खरमरीत टीका मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी करत जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्यास शिवसेना उद्धव ठाकरे गटाने प्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांना पाठविले हे आम्ही समजू शकतो, पण त्यांनी तारतम्य ठेवून बोलावे, राणे हे आमचे नेतृत्व असून या नेतृत्वास नाहक डीवचण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही श्री. आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मालवण भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर हे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक गणेश कुशे, ममता वराडकर, जगदीश गावकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, मोहन वराडकर, पंकज पेडणेकर, नंदू देसाई, श्री. डिचवलकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचे धाडस कोणी करू नये, ना. राणे यांच्यावर असे अनेकजण टीका करणारे आज रसातळाला गेले असून राणेंपुढे कोणीच टिकाव धरू शकले नाहीत. राणेंवर टीका करण्यापेक्षा अंधारे यांनी नेतृत्व करण्यास असमर्थ ठरलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रबोधन करावे अशी टीका आचरेकर यांनी केली.
नारायण राणे हे केंद्रात मंत्री असून कोकण, राज्य व आता ते देशपातळीवरील नेते आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, पर्यटन, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात ना. नारायण राणे यांनी क्रांती घडविली हे सर्व अंधारे यांच्या आकलन शक्तीच्या बाहेर असल्याने त्यांना ते उमगणार नाही. अंधारे यांचे शिवसेनेतील वय किती, त्या बोलतात किती ? जिल्ह्यात येऊन राणेंवर बोलण्याचे धाडस त्यांनी करू नये, राणेंवर टीका करून रसातळाला गेलेल्या शिवसेनेला वाचविण्याचा प्रयत्न सुषमा अंधारे यांनी करू नये असा इशाराही सुदेश आचरेकर यांनी यावेळी दिला.
