रॅली काढत केले मार्गदर्शन
मालवण (प्रतिनिधी)
भारत माता की जय… वंदे मातरम… लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर… सबसे प्यारा, संविधान हमारा… अशा घोषणा देत आणि भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन करत, राष्ट्रगीत म्हणत आज मालवणात संविधान दिनानिमित्त मालवण तालुका विधी सेवा समितीतर्फे संविधान रॅली काढून संविधानाबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.
भरड येथील दत्त मंदिर पासून सुरू झालेल्या या रॅलीचे उद्घाटन मालवण न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा मालवण तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री. ए. डी. तिडके तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्री. एम. आर. देवकते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी ऍड. अक्षय सामंत यांनी प्रास्ताविक केले. दत्त मंदिर येथे संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन केल्यावर भरड येथून बाजारपेठ मार्गे, फोवकांडा पिंपळ ते टोपीवाला हायस्कुलपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत मालवण मधील वकील तसेच टोपीवाला हायस्कूल व भंडारी हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक या सहभागी झाले होते. संविधान जनजागृती बाबत घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान संविधान प्रास्तविक वाचन करण्यात आले, तर ऍड. सोनल पालव यांनी प्रतिज्ञा सांगितली व ऍड. समीर गवाणकर यांनी राष्ट्रभक्ती गीत सादर केले.
या रॅलीचे सांगता टोपीवाला हायस्कुल येथे झाली. यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश ए. डी. तिडके म्हणाले, जगात प्रत्येक देशाची राज्यघटना असून त्या घटनेनुसार देश चालत असतो. आपल्या भारत देशाची राज्यघटना म्हणजेच संविधान हे जगातील मोठे व आदर्शवत संविधान आहे. या संविधानाने देशातील नागरिकांना विविध मूलभूत हक्क व अधिकार देताना प्रत्येक व्यक्तीस आपले जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे संविधानाचे आपल्या जीवनात मोठे महत्व असून हे महत्व प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे, असेही न्यायाधीश श्री. तिडके म्हणाले.
आभार ऍड. अक्षय सामंत यांनी मानले. यावेळी ऍड. माधवी बांदेकर, ऍड. गिरीश गिरकर, ऍड. हेमेंद्र गोवेकर, ऍड. सोनल पालव, ऍड. समीर गवाणकर, ऍड. बावकर, ऍड. हृषीकेश देसाई, ऍड. अंबरीश गावडे, ऍड. अमृता मोंडकर, ऍड. सुमित जाधव, ऍड. समृद्धी आसोलकर, ऍड. सुदर्शन गिरसागर तसेच कर्मचारी सहाय्यक अधीक्षक श्री. देवगडकर, सहाय्यक अधीक्षक वित्त विभाग टेंबकर, इतर न्यायालयीन कर्मचारी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
