बांधकामने घेतली निवेदनाची दखल;ग्रामस्थ, वाहनधारकांकडून समाधान
⚡सावंतवाडी ता.२६सहदेव राऊळ-:* गुळदूवे ते आरोंदा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडी बांधकाम विभागाच्यावतीने आज तोडण्यात आली. त्यामुळे गुळदुवे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाकडे निवेदनातून केलेल्या मागणीला अखेर यश आल आहे. यामुळे येथील ग्रामस्थ, वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मळेवाड-गुळदूवे ते आरोंदा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. या झाडीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे तसेच काही दिवसांपूर्वी गुळदुवे येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर हे मळेवाड वरुन आपले काम आटोपून घरी जात असताना रात्री पावणे नऊच्या सुमारास या झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला होता. मात्र शेटकर हे सुदैवाने थोडक्यात बचावले होते. तसेच गुळदुवे येथील ग्रामस्थांच्या पाळीव कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला केला होता. त्यात करून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी वाढलेली त्यामुळे हे जंगली प्राणी या झाडीचा आसरा घेऊन अचानक येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थ, पादचारी, वाहनधारकावर हल्ला करण्याची दाट शक्यता होती. तसेच वाहनधारकांना सुद्धा या झाडीमुळे वाहने चालविताना त्रास होत होता. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत होती. या सर्व गोष्टींचा विचार करून गुळदुवे ग्रामस्थांच्यावतीने बांधकाम विभागाला ही झाडी तोडण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची तत्काळ दाखल घेत या रस्त्यावर वाढलेली झाडी तोडण्याचे काम बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले. यामुळे येथील ग्रामस्थ, वाहनधारकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
