मडुऱ्यातील वालावलकर कुटुंबीयांचा मतदानावर बहिष्कार

अधिकाऱ्यांकडूनच होतेय अधिकाराची पायमल्ली : उपोषण छेडूनही दुर्लक्ष; प्रकाश वालावलकर यांचा आरोप

⚡बांदा ता.१८-: शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकशाहीचा अवमान करत आमच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली केली आहे. रेल्वे विभाग, महावितरण, तिलारी कालवा, कृषी विभाग, बांधकाम विभाग मधील अधिकारी लोकशाहीचा अवमान करत असल्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. याकडे कोणाचाही लक्ष जात नसल्याने येत्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही वालावलकर कुटुंबीय मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचे लेखी पत्र प्रकाश गोपाळ वालावलकर यांनी कुटुंबियांच्यावतीने सावंतवाडी तहसीलदार यांना दिले आहे.
श्री. वालावलकर म्हणाले की, लोकप्रिय सार्वभौम भारताच्या संविधानाचा आदर करून आजपर्यंत आम्ही मतदान करत आलो. शासकीय अधिकारी कर्मचारी लोकशाहीचा अवमानच करतात. रेल्वे अतिक्रमण विषयी उपोषणा, तिलारी कालवा पाणी प्रश्न उपोषणास बसावे लागते, रेल्वे थांबण्यासाठी उपोषण, महावितरणकडून धोकादायक लाईनमुळे कधी अपघात होईल हे सांगता येत नाही, कृषी विभागात अपुरा कर्मचारी वर्ग तसेच गावातील पायवाटाचे तीन तेरा, गावातून जाणारा बांदा-शिरोडा रस्त्यावरील खड्ड्यात कधी कोणाचा जीव जाईल हे सांगता येणार नाही. अशा सर्व शासकीय यंत्रणेतील भयावह परिस्थितीत आम्ही मतदान का करावे, असा सवाल श्री.वालावलकर यांनी सावंतवाडी तहसीलदार यांना केला.
प्रशासकीय अधिकारी यंत्रणा जोपर्यंत आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नाही तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही मतदान करणार नाही असा इशारा प्रकाश गोपाळ वालावलकर, उल्हास नारायण वालावलकर, दत्तात्रय रमेश वालावलकर कुटुंबीयांनी सावंतवाडी तहसीलदार यांना लेखी दिला.

You cannot copy content of this page