पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले गौरव उद्गार
बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी येण्यास नाखुष असतात. पदवी घेऊन मोठ्या महानगरात दवाखाना थाटून सेवा देतात. मात्र ग्रामीण भागात सेवाभावी वृत्तीने काम करणारे डॉ. जगदीश पाटील यांच्यासारखे वैद्यकीय अधिकारी हे दुर्मिळ आहेत. आपण कोरोना कालावधीत देखील त्याना तळमळीने काम करताना पाहिले आहे. समाजहीत जपणाऱ्या अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची जिल्ह्याला नितांत गरज आहे असे कौतुकोदगार पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे काढले.
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्राचे लोकार्पण मंत्री चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी डॉ. पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.
मंत्री चव्हाण म्हणाले की, कोरोनाचे मोठे संकट देशासह राज्यावर देखील होते. कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधेचा सामना करत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी चांगले काम केले. आपण स्वतः त्यावेळी बांदा केंद्रात येऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांचे काम बघितले होते. त्यांनी कोरोना काळातही उत्तम आरोग्य सेवा रुग्णाना दिली. सेवाभावी वृत्तीने काम कसे करावे याचे आदर्श उदाहरण डॉ. पाटील आहेत.
टेलिमेडिसिन हेल्थ किटचा वापर ग्रामीण भागातील जास्तीत जास्त रुग्णांसाठी करावा असे आवाहनही यावेळी मंत्री पाटील यांनी केले.
