⚡मालवण ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी पणदूर सरपंच तथा भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी मालवण येथे ही निवड जाहीर करून श्री. साईल यांना नियुक्ती पत्र सुपूर्द केले.
पणदूर गावचे सरपंच आणि भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा साईल यांच्यासारख्या तरुण तडफदार आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यामागे या संघटनेच्या कामांना अधिक गती देता यावी आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय देता यावा हा उद्देश असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे जिल्ह्याची उर्वरित कार्यकारणी आणि जिल्हा सल्लागारांची नेमणूक येत्या काही कालावधीतच आपण करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर दादा साईल यांनी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांचे आभार मानले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, भाजपा नेते निलेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या संघटनेतील सर्व वीज कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील राहून संघटनेला अधिक व्यापक बळ देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहूया असे आवाहन नूतन कार्याध्यक्ष दादा साईल यांनी केले. यावेळी सिंधुदूर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनचे सरचिटणीस संदीप बांदेकर, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश पवार, रुपेश जाधव, विलास सांवत, हरेश लांबोरे आदी उपस्थित होते.
