हरी खोबरेकर यांचा आरोप
⚡मालवण ता.३०-: दिवाळीनिमित्त राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने राबविलेल्या आनंदशिधा उपक्रमात आज पर्यंत केवळ २० टक्के जनतेला आनंदशिधा वाटप झाला असून त्यामध्येही अर्धवट शिधा वाटप झाला आहे. तर काही ठिकाणी आनंद शिधा अद्यापही पोहचलेला नाही. या शिध्यामधील वस्तूही दर्जाहीन असून वाटपावर शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. आनंदशिध्यातून जनतेला कोणताही आनंद मिळालेला नाही. आनंदशिधा वाटपातून राज्य सरकारने जनतेची थट्टा केली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
मालवण शिवसेना शाखा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आनंद शिधा अद्यापही मिळाला नसल्याच्या तसेच कमी वस्तू मिळल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आमच्याकडे येत आहेत. अनेक ठिकाणी आनंद शिधा न पोहचल्याने गावागावात लोकांना रेशन दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही दुकाने लांब असल्याने प्रवास खर्चही होत असून त्याचा भुर्दंड लोकांना सोसावा लागत आहे. काही ठिकाणी सत्ताधारी आमदार आनंद शिधा वाटपाचे थाटामाटात उद्घाटन करून आपले फोटो लावून बॅनरबाजी करत आहेत. स्वतःला पुरणपोळी खाण्यासाठी पातेलेभर तूप लागते असे भाजपचेच नेते सांगतात, मात्र दुसरीकडे आनंद शिध्यातून लोकांना दर्जाहीन व हानिकारक तेल वाटप होत आहे, ही शोकांतिका आहे, अशी टीका हरी खोबरेकर यांनी केली.
शासकीय निधीतून आनंद शिधा उपक्रम राबविला जात असतानाही त्याचे वाटप होत नसेल तर यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. लोकांची अशी दिशाभूल करण्यापेक्षा आनंदशिध्याची रक्कम प्रत्येक रेशन कार्ड धारकाच्या बँक खात्यावर जमा केली असती तर लोक दिवाळीत आवश्यक वस्तू खरेदी करू शकले असते. त्यातून लोकांना खरा आनंद मिळाला असता. सध्या महागाईने जनता होरपळली असून २०१४ साली ४१० रुपये किंमत असणाऱ्या गॅस सिलेंडरची किंमत २०२२ मध्ये १०५३ रुपयांवर पोहचली आहे. पेट्रोल, डिझेल यांच्या किंमतीबरोबरच खाद्य तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. अशात आपण काहीतरी गिफ्ट देऊन लोकांना दिलासा देत असल्याचे भासवून राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका हरी खोबरेकर यांनी करत यामुळे जनता नाराज झाली आहे, असेही सांगितले.
तसेच राज्यात होऊ घातलेले मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. टाटा एअरबसचा प्रकल्पही गुजरातला गेला आहे. आताचे राज्य सरकार हे गुजरातला मोठे करण्यासाठी महाराष्ट्राला खालसा करण्यासाठी निर्माण केले गेले आहे, अशी टीकाही हरी खोबरेकर यांनी केली. महागाई, बेरोजगारी यामुळे जनता त्रस्त बनली आहे. याबाबत राज्यसरकार कडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात महागाई व बेरोजगारी या प्रश्नांबाबत शिवसेना आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही खोबरेकर यांनी दिला.
