⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला शहरात गटार स्वच्छता बाबतीत आपल्या भटवाडी कार्यक्षेत्रावर अन्याय होत असल्यामुळे नगरसेवक प्रशांत आपटे यांनी कर न भरण्याचा इशारा दिला होता. तसेच नगरसेवक पिंट्या सावंत यांनीही भटवाडी भागाकडे नगरपरिषदेने लक्ष पुरवावे, अशी मागणी केली होती. अन्य नगरसेवकांनीही सर्वसाधारण सभेत शहरातील गटार स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान याबाबत वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी नगरपरिषद प्रशासनास त्वरित सूचना दिल्यानंतर वेंगुर्ला वेशी भटवाडी एरियात गटार स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शहरात हॉस्पिटल नाका ते कॅम्पकडे तसेच वेंगुर्ला कॅम्प एरियात नगरपरिषदमार्फत गटारातील झाडी स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. नगरपरिषद अधिकारी गणेश कांबळे यांनी मे महिना सुरुवातीपासून शहरात गटार स्वच्छता मोहीम ठिकठिकाणी सुरू असल्याचे सांगितले. उर्वरित गटार स्वच्छताही पावसाळी हंगामाच्या दृष्टीने लवकरात लवकर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान हॉस्पिटल नाका नजिक मुख्य रस्त्यावर कठड्याचे तुटलेले दगड ठेवण्यात आले असून ते धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. वेंगुर्ला हायस्कूल समोरील गटाराचे काम करण्यात आले असून ते अर्धवट अवस्थेत असल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. मच्छीमार्केटकडे जाणाऱ्या मार्गातील पत्रे तुटल्याने दुचाकी वाहनधारकांना धोका निर्माण होत आहे. तसेच वाहनतळ कार्यक्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा वावर मच्छीविक्रेत्यासाठी तसेच वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत असून संबंधित प्रशासनाने येथील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांतून व वाहनधारकातून करण्यात आली आहे.
वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या सूचनेनंतर शहरात गटार स्वच्छता…
