श्री. शंकर घारे ; पं. स. सभेत गटशिक्षणाधिकारी यांना निर्देश
⚡वेंगुर्ला ता.१९-:
शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. 15 जून 2026 रोजी शालेय नवीन वर्ष हंगाम सुरू झाला असून शैक्षणिक कालावधीत शिक्षकांमार्फत वारंवार शिक्षणाव्यतिरिक्त मोबाईलचा शाळेत जादा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचा मुद्दा वेंगुर्ला पं. स. उपसभापती सचिन देसाई यांनी सभागृहात उपस्थित केला. याबाबत विद्यार्थ्यांना शिक्षण योग्य प्रकारे मिळण्यासाठी “शालेय शिक्षण अध्यापन वेळेत” शिक्षकांना मोबाईलचा वापर करण्यास पूर्णतः बंदी करण्यात यावी, अशा सूचना उपसभापती सचिन देसाई यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान याबाबत तातडीने कार्यवाही करून तालुक्यातील सर्व शाळातील शिक्षकांना तशा सूचना निर्गमित करण्याचे आदेश सभापती शंकर घारे यांनी गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांना दिले. तसेच काही शिक्षकांचे अन्य व्यवसाय असून त्यासाठी शिक्षकांमार्फत शाळेत मोबाईलद्वारे जास्त वेळ वाया जात असल्याचे निदर्शनास आले असून ही बाब शिक्षणाच्या दृष्टीने फार गंभीर आहे. याकडे तातडीने लक्ष न पूरविल्यास तालुक्यात शाळा स्तरावर धडक देऊन कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश सभापती शंकर घारे यांनी दिले. याबाबत त्यांनी वजराट शाळा नं. 1 येथील शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या ‘मोबाईल बंद’ बाबत कौतुक करण्यात आले. वेंगुर्ला पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवार दि.19 जून रोजी पंचायत समिती बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, जिल्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजित पिसाळ, म्हापण पंचायत समिती सदस्य विष्णू फणसेकर, आडेली पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, आसोली सदस्य संकेत धुरी, तुळस पंचायत समिती सदस्या सुचिता वजराटकर, शिरोडा सदस्य योगिता परब, वायंगणी सदस्य शितल राऊत, उभादांडा सदस्य साक्षी नार्वेकर, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी तसेच अन्य विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अन्य विविध विषयावर चर्चा व ठराव घेण्यात आले.
