⚡सावंतवाडी ता.१९-: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्याच्या पथकाने बांदा-दाणोली मार्गावरील विलवडे येथील चर्चसमोर मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैध वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत मद्यासह वाहन असा एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१८ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पथकाने महिंद्रा सुप्रो टिपर डायव्हर वाहनाची तपासणी केली. वाहनाच्या मागील भागात व डिकीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रँडचे ३५ बॉक्स आढळून आले. या प्रकरणी वाहनचालक संतोष मुरलीधर नागरे (रा. पिंपळगाव बहुला, जि. नाशिक) व रविंद्र भाऊसाहेब शिंदे (रा. रेडगाव, ता. चांदवड, जि. नाशिक) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत ४ लाख ५५ हजार ४० रुपये, तर वाहनाची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असून एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून पुढील तपास त्यांच्याकडून सुरू आहे.
