सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘स्टॉप डायरिया मोहीम २०२६’ प्रभावीपणे राबविणार..
⚡ओरोस ता १९-: पाच वर्षांखालील मुलांमध्ये अतिसारामुळे (डायरिया) होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘स्टॉप डायरिया मोहीम २०२६’ राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएस ची घेऊनी साथ” हे या मोहिमेचे मुख्य घोषवाक्य असून अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हे या मोहिमेचे अंतिम ध्येय असल्याचे डॉ धुरी यांनी सांगितले.
शुक्रवारी आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ धुरी बोलत होत्या. यावेळी विस्तार व माध्यम अधिकारी निलेश मठकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ धुरी यांनी, ही मोहीम जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे. पहिला टप्पा १ ते १५ जून २०२६ या कालावधीत ‘पूर्वतयारी टप्पा म्हणून राबविण्यात आला. यामध्ये मोहिमेचे सूक्ष्म नियोजन, जिल्हा व तालुकास्तरीय कृती दलाची स्थापना, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, ओआरएस व झिंक गोळ्यांचा पुरेसा साठा सुनिश्चित करणे आणि आरोग्य संस्थांमध्ये ओआरएस-झिंक कॉर्नरची स्थापना करणे आदी बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
मोहिमेचा दुसरा टप्पा १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ‘प्रत्यक्ष अंमलबजावणी टप्पा’ म्हणून राबविला जात आहे. या अंतर्गत विविध उपक्रम व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आशा स्वयंसेविकांमार्फत गृहभेटी व वाटप, आरोग्य संस्था व अंगणवाड्यांमध्ये कॉर्नर्स, जोखीमग्रस्त क्षेत्रांवर विशेष लक्ष, शाळा व अंगणवाड्यांमध्ये जनजागृती याचा समावेश आहे.
