तालुकाप्रमुख हरी खोबरेकर : मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली
⚡मालवण ता.२०-: एसीबीकडून आ. वैभव नाईक यांना नोटीस बजावल्याच्या विरोधात कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम. भास्कर जाधव यांच्या सारख्या वाघाने डरकाळी फोडल्यानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेकांची कोल्हेकुई सुरु झाली असून जाधव यांच्या घरावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. आम.जाधव यांच्या घरावरील हल्ल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या कडून निषेध करण्यात येत असून आम. जाधव यांच्या केसाला धक्का लागला तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक पेटून उठतील, मोर्चा हा ट्रेलर होता, पिक्चर अभि बाकी है, पळता भुई थोडी होईल, असा इशारा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपला पत्रकार परिषदेत दिला.
मालवण शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर बोलत होते. यावेळी उपातालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, सन्मेश परब, नरेश हुले, अन्वय प्रभू, प्रसाद आडवलकर, गौरव वेर्लेकर, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या नेत्यांना खुश करण्यासाठी वायफळ बडबड करू नये. टिका सहन करायची ताकद नसेल तर भाजप नेत्यांनीही दुसऱ्यांवर टीका करू नये. भाजपा नेत्यांकडून भास्कर जाधव यांची लायकी काढली जात आहे. प्रत्यक्षात आ. जाधव यांना विधिमंडळात उत्कृष्ट वक्ता म्हणून बहुमान मिळाला आहे. हा बहुमान विकत घेता येत नाही, त्यासाठी मतदार संघातील प्रश्न मांडावे लागतात. भाजपच्या नेत्याला एकदा तरी असा बहुमान मिळाला आहे का ? याचा विचार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी करावा, असेही खोबरेकर म्हणाले.
आ. भास्कर जाधव यांची राणेंवर बोलण्याची पात्रता नाही, असा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जातो. तर मग देशातील टॉप ५ मध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर सातत्याने गरळ ओकणाऱ्या तुमच्या नेत्यांची पात्रता आहे का? आम. जाधव यांची लायकी काढण्यापेक्षा पातळी सोडून बोलणाऱ्या तुमच्या नेत्यांच्या तोंडाला कुलपे लावा आणि नंतर आ. भास्कर जाधव यांना सल्ले द्या, असेही खोबरेकर म्हणाले. भाजपचे नेते केंद्रात आहेत. वाढती महागाई कमी करणे, रुपयाचा घसरत असलेला दर स्थिर ठेवणे, देशाचा जिडीपी कसा वाढेल, यासाठी त्यांनी केंद्र शासन स्तरावर प्रयत्न करावेत, असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना द्यावा, असेही हरी खोबरेकर म्हणाले.
