⚡मालवण ता.१९-: नगर वाचन मंदिर, मालवण आयोजित जिल्हास्तरिय कवी शरद साटम स्मृति काव्यस्पर्धा संस्थेच्या सभागृहात पार पडली. या स्पर्धेत दर्श बलराम सामंत( मालवण) याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर द्वितीय क्रमांक बबन हिवाळेकर (हिवाळे), तृतीय क्रमांक अस्मी अशोक आठलेकर यांनी मिळविला.
या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, देवी सरस्वती व कवी शरद साटम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी व्यासपिठावर परिक्षक रविंद्र वराडकर, संस्थेचे ग्रंथपाल संजय शिंदे, अॅड. पलाश चव्हाण, नियमित वाचक मेक्सी डिसोजा आणि नितेश पेडणेकर उपस्थित होते.
या स्पर्धेत जिल्हाभरातून २३ कविता या दाखल झाल्या होत्या. या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मंदार सांबारी (आचरा), उत्तेजनार्थं द्वितिय क्रमांक दीप घोगळे (मालवण) यांना देण्यात आला. तर प्रथम आलेल्या तीन यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कमेची पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेसाठी सहभागी इतर स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेला काव्य रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रेया चव्हाण, प्रतिभा पेडणेकर व रमाकांत जाधव यांनी परिश्रम घेतले.
