सेवांगणमध्ये विद्यार्थी- पालक मेळावा संपन्न

⚡मालवण ता.१९-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण मध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त सेवांगणच्या मोफत शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गातील विद्यार्थी व पालक यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी मनोगते व्यक्त करत वाचनाचे महत्व विशद केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सेवांगणचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिष्यवृती मार्गदर्शन वर्गातील विद्यार्थी ओजस घाडीगावकर याने त्याने वाचलेल्या मृत्युंजय व श्रीमान योगी या पुस्तकावर मनोगत व्यक्त केले. ग्रंथपाल ऋतुजा केळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून वाचन दिनाचे महत्व पटवून दिले.

यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना श्री. परुळेकर यांनी वाचनाचे महत्व सर्वांना समजावून सांगत वाचनामुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो असे मत मांडले. तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी मुलांनी आता पासूनच भरपूर वाचन करून आपला बौद्धिक विकास साधावा, यासाठी सेवांगणच्या वाचनालयाचा लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले. शिष्यवृत्ती वर्गाच्या मार्गदर्शिका मनाली वेंगुर्लेकर यांनी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी मुलांच्या प्रगती बाबत चर्चा करून मुलांच्या यशासाठी स्वतः वेळ देऊन तयारी करून घ्यावी, असे आवाहन केले. सराव परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमास संस्थेचे कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, सौ. ज्योती तोरसकर, व्यवस्थापक संजय आचरेकर , ग्रंथपाल ऋतुजा केळकर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कौटुंबिक सल्ला केंद्राच्या अदिती कुडाळकर, विजय कुडाळकर, सोनाली वस्त आदी उपस्थित होते. आभार मनोजकुमार गिरकर यांनी मानले.

You cannot copy content of this page