जेष्ठ विचारवंत महाबळेश्वर सामंत यांचे आवाहन
बांदा/प्रतिनिधी
आपला भारत देश जागतिक महासत्ता बनवण्याचे स्वप्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले. भारत देश आण्विक सक्षम करण्याकडे अधिक लक्ष दिले आणि मे १९९८ ला पोखरण मध्ये देशातील सर्वात शक्तिशाली अणू चाचणी करून सक्षम भारताची जगाला ओळख करून दिली. आपला देश जागतिक महासत्ता बनवणे हे त्यांचे स्वप्न होते. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे डॉ. कलाम यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत घेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत महाबळेश्वर सामंत यांनी येथे केले.
येथील नट वाचनालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.
यावेळी उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंगांना उजाळा दिला.
प्रकाश पाणदरे म्हणाले, आपला देश महासत्ता बनवून जगात नावलौकिक मिळवेल हे स्वप्न त्यांनी पाहिले होते. हे स्वप्न देशातील तरुण पूर्ण करतील असा विश्वास त्यांना होता. म्हणून आयुष्यभर शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे दिवसातील जास्तीत जास्त वेळ वाचनाला देऊन वाचक कसा वाढवता येईल, त्यासाठी “वाचला तो टिकला” हे ब्रीद वाक्य लक्षात घेऊन आजपासून प्रत्येकाने वाचनावर भर द्यावा. वाचनाने मनुष्य कितीतरी पटीने ज्ञानी होऊ शकतो यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा. यावेळी वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी वाचनालयचे कार्यवाह राकेश केसरकर, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोसकर, सुधीर साटेलकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, शिक्षक जे डी पाटील, अंकुश माजगावकर, अनंत भाटे, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब यांच्यासह वाचक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेच्या इयत्ता पाहिलीतील ५० विद्यार्थ्यांनी बाल वाचक सभासद नोंदणी केली.
फोटो :-
बांदा नट वाचनालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाट्न करताना मान्यवर व विद्यार्थी.
