विविध विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी संघटना करणार समन्वय समिती स्थापना

१५ रोजी सिंधुदुर्गनगरी येथे बैठक
सर्व संघटना प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

⚡ओरोस ता १३-: जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. याबाबत संघटित आवाज उठविण्यासाठी जिल्ह्यात सर्व विभागांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. याकरिता १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद सेवा निवृत्तीवेतन धारकाच्या विविध संवर्गातील विविध संघटना आहेत. प्रत्येक संघटना आपापल्यापरीने काम करीत आहेत. तरी सुद्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासन दाद देत नाही. निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या वर्षानुवर्षे तशाच पडून आहेत. वारंवार तालुका व जिल्हा अदालतीतही समस्या मांडून उपयोग होत नाही. कोकणातील गणेश उत्सवा सारख्या महत्वाच्या सणाकरीता निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणेसाठी शासनाने आदेश काढूनही कालच्या गणेश उत्सवाला प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निवृत्तीवेतनाचा लाभ वेळीच मिळू शकलेला नाही.
या सर्व बाबींचा विचार करता सेवानिवृत्ती धारकाच्या विविध समस्यांचे वेळीच निवारण होण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित लढा देणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्व संघटनांची मिळून जिल्हास्तरावर एक “समन्वय समिती” गठीत करणे गरजेचे आहे. त्याकरीता शनिवार १५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी 10 वाजता प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था कार्यालय सिंधुदुर्गनगरी या ठिकाणी सर्व सेवानिवृत्त निवृत्तीवेतन धारकाच्या संघटना प्रतिनिधींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. तरी सर्वानी सदर सभेस वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, प्रकाश राणे, रावजी यादव, रविकांत मुसळे, बाबली वायंगणकर, चंद्रकांत पाटकर, राजश रेगे, हनुमंत प्रभू यांनी केले आहे.

You cannot copy content of this page