दत्ता सामंत:भजन महोत्सव २०२६ च्या उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न..

⚡मालवण ता.१२-:
“भजन ही केवळ करमणुकीची कला नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि अध्यात्माची समृद्ध परंपरा पुढे नेणारे प्रभावी माध्यम आहे. भजनाच्या माध्यमातून समाजाला चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाने अध्यात्माची कास धरली तर मनाला शांती आणि जीवनाला योग्य दिशा मिळू शकते,” असे प्रतिपादन मालवणचे उद्योजक दत्ता सामंत यांनी केले.
मालवण येथील श्री भैरवी देवालय, संतसेना मार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या भजन महोत्सव २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दत्ता सामंत यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी बुवा विनय नांदोस्कर यांचा दत्ता सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री सामंत म्हणाले, “आपल्या कोकणच्या मातीत भजन, कीर्तन आणि अध्यात्माची मोठी परंपरा आहे. या परंपरेमुळे पिढ्यान्पिढ्या संस्कारांची शिदोरी पुढे गेली आहे. भजनातून संतांचे विचार आणि अध्यात्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे अशा भजन महोत्सवांचे आयोजन ही काळाची गरज आहे असे सांगून ते पुढे म्हणाले, “अध्यात्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे, तर माणसाने माणसाशी प्रेमाने वागणे, समाजासाठी योगदान देणे आणि चांगले संस्कार पुढील पिढीला देणे होय. भजनातून भक्तीबरोबरच एकता, बंधुभाव आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण होते. त्यामुळे भजनाची ही परंपरा अधिक जोमाने पुढे नेली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
“तरुण पिढीला आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी भजन, कीर्तन आणि धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीच्या काळातही आपल्या संतपरंपरेतील विचार तरुणांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,” असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी सभापती प्रज्ञा चव्हाण, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर, शहर व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना शहरप्रमुख राजू बिडये, नाभिक समाज तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, बाळगोपाळ मंडळ अध्यक्ष अंकुश चव्हाण, भैरवी देवालय मंडळ अध्यक्ष विजय चव्हाण, आनंद आचरेकर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन कांता चव्हाण यांनी केले.
