भूजल पातळी वाढविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा पुढाकार:केर गावात लोकसहभागातून कच्चे बंधारे..

⚡दोडामार्ग, ता. १२-: पावसाचे घटते प्रमाण आणि भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी भूजल पातळी वाढविणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने केर गावात लोकसहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केरच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमचंद्र देसाई यांच्या मोलाच्या योगदानातून तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गीतांजली सातार्डेकर, श्रावणी पाडगावकर आणि नाईक सर यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. गावपातळीवर जलसंधारणाचे महत्त्व ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमासाठी केर गावच्या सरपंच रुक्मिणी नाईक, पोलीस पाटील सर्वेश देसाई आणि मार्गदर्शक ग्रामसेवक संदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच केर येथील ग्रामस्थ, अंगणवाडी कर्मचारी तसेच केर-निडली येथील सेविका व मदतनीस यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम गावाच्या जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविण्याचा संदेश देत सामूहिक सहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविता येतात, हे केर गावाने दाखवून दिले आहे.
लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा जलसंधारण उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणारा असून, भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा उपक्रमांची व्यापक प्रमाणावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
