Headlines

दुष्काळाची चाहूल लागताच बालसभा उतरली बांधावर…

पाडलोसच्या ओम गणेश बालसभेचा जलसंवर्धनासाठी पुढाकार; देऊळवाडीत ग्रामस्थांच्या श्रमदानातून दोन मातीचे बंधारे..

⚡बांदा ता.१२-:
पावसाचा तुटवडा जाणवू लागल्याने संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीची चाहूल लागताच पाण्याचे महत्त्व ओळखून पाडलोस येथील ओम गणेश बालसभेने थेट बांधावर उतरत जलसंवर्धनाचा आदर्श घालून दिला. पाण्याची बचत, पावसाचे पाणी अडविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत बालसभेच्या पुढाकारातून पालक, ग्रामस्थांनी पाडलोस देऊळवाडी येथे दोन मातीचे बंधारे घालण्यात आले.
ओम गणेश बालसभेच्या माध्यमातून पाडलोस गाव ग्रुप आणि रवळनाथ मित्र मंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, कोषाध्यक्ष साईश नाईक, सहसचिव दिशा पाडलोसकर, अंगणवाडी मदतनीस शमिका शेटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, ग्रामसंघ कोषाध्यक्ष मयुरी कुबल, सीआरपी नेहा नाईक, लिपिका शीतल गावडे, माजी सरपंच सुनेत्रा गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदा गावडे, पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण माधव, पाडलोस सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे, ग्रामस्थ सौरभ गावडे, प्रज्योत माधव, सर्वेश गावडे, प्रकाश नाईक, संगीता गावडे, आशा सेविका विजया गावडे आणि कृषी सहायक वैभव ननावरे उपस्थित होते. तसेच ओम गणेश बालसभेचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. मळेवाड प्रभाग व्यवस्थापक प्रचिती मडुरकर यांनीही शुभेच्छा दिल्या.
जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्या : वैभव ननावरे
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी सहायक वैभव ननावरे यांनी बालसभेच्या उपक्रमातून केले.
बालसभेने जपली सामाजिक बांधिलकी
बालवयातच जलसंवर्धनाची जाणीव निर्माण करणाऱ्या या उपक्रमातून पाडलोसच्या ओम गणेश बालसभेने सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला असे, उमेदचे अनुप देऊलकर यांनी सांगितले.

पाडलोस : बंधारा घातल्यानंतर बालसभा सदस्य, ग्रामस्थ, पालक, पदाधिकारी व इतर.

You cannot copy content of this page