महिला व बालविकास विभागामार्फत घेण्यात आल्या स्पर्धा
मालवण, दि प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक स्पर्धेत सहा महिने ते तीन वर्ष या वयोगटात चैतन्य करलकर तर तीन वर्षे ते पाच वर्षे वयोगटात आराध्या परब यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून राबविला जातो. या महिन्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी संपूर्ण राज्यात सर्व अंगणवाड्यांमध्ये एकाच दिवशी स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली. तालुक्यामध्ये सर्व २३२ अंगणवाड्यांमध्ये स्वस्थ बालक स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सहा महिने ते तीन वर्ष आणि दोन वर्ष ते पाच वर्ष या दोन वयोगटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक अंगणवाडी मधून प्रथम दोन क्रमांकांची निवड करून त्यांना ग्रामस्तरावर बक्षीस देण्यात आली. त्यानंतर प्रत्येक बीटनिहाय वयोगटनिहाय दोन क्रमांकाची निवड करून तालुकास्तरावर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सहा महिने ते तीन वर्षाच्या वयोगटात कौस्तुभ सातार्डेकर तर तीन वर्ष ते पाच वर्षे वयोगटात तन्वीर शेख यांना द्वितीय क्रमांक मिळाला. बक्षीस वितरण समारंभास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष उमेश सांगोडकर, अभय कदम, कृषी अधिकारी संजय गोसावी, आरोग्य विस्तार अधिकारी सुरज बांगर, आरोग्य सहाय्यक श्री. नाईक एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ- पराडकर, यांच्यासह मुख्य सेविका उपस्थित होत्या.
फोटो ओळी- महिला बाल विकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या स्वस्थ बालक स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
