रुपेश राऊळ यांचा आरोप:नवीन विहीर कुठे आहे..?: संजू परबांच्या आक्रमक भूमिके नंतर सभापतींना राजीनामा द्यावा लागतो हे सत्ताधाऱ्यांच आपयश,तर पालकमंत्र्यांनी अधिकारी व ठेकेदारांची चौकशी लावणार का..?

⚡सावंतवाडी, ता.०९-: आरोंदा येथील जाधववाडीमध्ये जिल्हा परिषद जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या जलार्पण कार्यक्रमावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. नवीन विहीर बांधण्याऐवजी २००९ मध्ये बांधण्यात आलेल्या जुन्याच विहिरीची रंगरंगोटी करून ती नवीन विहीर म्हणून दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे.
या प्रकरणात सुमारे १० ते १५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा दावा त्यांनी केला असून, संबंधित अधिकारी, पदाधिकारी व ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.सावंतवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊळ यांनी हा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोंदा जाधववाडी येथे २००९ मध्ये ‘यशवंत ग्राम समृद्धी योजने’तून सुमारे नऊ लाख रुपये खर्च करून विहीर बांधण्यात आली होती. जलजीवन मिशनअंतर्गत याच ठिकाणी नवीन विहीर बांधणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात नवीन विहीर उभारण्यात आली नसल्याचा दावा त्यांनी केला.
जुन्या विहिरीवर रंगरंगोटी करून जलार्पण कार्यक्रम घेण्यात आल्याचे सांगत, “नवीन विहीर नक्की कुठे आहे?” असा सवाल राऊळ यांनी उपस्थित केला. या कामाच्या खर्चाची तसेच प्रत्यक्ष कामाची चौकशी झाल्यास कथित गैरव्यवहार स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या कार्यक्रमाबाबत आरोंदाचे माजी उपसरपंच आबा केरकर, संजीव पेडणेकर, बबन नाईक व सिद्धेश नाईक यांनी यापूर्वीच हरकती नोंदवल्या होत्या, असा दावा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तसेच त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न देता कार्यक्रम पार पडल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आले असून, संपूर्ण कामाची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दोष आढळल्यास संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच ठेकेदाराचीही चौकशी करून दोषी आढळल्यास त्याच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी राऊळ यांनी केली.
“केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोप न करता या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कागदोपत्री खर्च आणि प्रत्यक्ष झालेल्या कामाची पडताळणी करण्यात यावी. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
तर संजू परबांच्या आक्रमक भूमीनंतर सभापतींना राजीनामा द्यावा लागतो हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका देखील रुपेश राऊळ यांनी केली आहे. तर पालकमंत्र्यांनी ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट व अधिकाऱ्यांची देखील चौकशी करून त्यांना देखील निलंबित करण्याची हिम्मत पालकमंत्र्यांनी दाखवावी असे आव्हान देखील रुपेश राऊळ यांनी दिले आहे.
या पत्रकार परिषदेला शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख राजू शेटकर, अशोक धुरी, मच्छीमार नेते गोकुळदास मोटे, माजी उपसरपंच आबा केरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आरोपांमुळे आरोंदा जलजीवन मिशनच्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासनाकडून चौकशी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
फोटो : सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना (उबाठा) विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ. सोबत राजू शेटकर, अशोक धुरी, गोकुळदास मोटे, आबा केरकर आदी.
