मालवण बंदर जेटीवरील हाणामारी प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल

दोन्ही गटाकडून देण्यात आल्या तक्रारी

मालवण (प्रतिनिधी)

मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर स्टॉल उभारणीवरून काल रविवारी पर्यटन व्यावसायिक सतीश आचरेकर व गौरव प्रभू यांच्यात झालेल्या तुंबळ हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांकडून मालवण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत यामध्ये सतीश रामचंद्र आचरेकर, आनंद रामचंद्र आचरेकर (दोन्ही रा. मेढा मालवण) तसेच गौरव सुरेंद्र प्रभू, चंद्रकांत सुरेंद्र प्रभू (दोन्ही राहणार दांडी, मालवण) यांच्यासह दोन्ही गटातील अन्य व्यक्तींविरोधात परस्पर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिली आहे.

मालवण बंदर जेटी येथे जलक्रीडा व्यवसायाचा स्टॉल उभारण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गौरव प्रभू व सतीश आचरेकर या दोन व्यावसायिकांच्या गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. यात दोन्ही गटातील काहीजण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी मालवण पोलीस स्थानकात धाव घेतली होती. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रार दिल्या आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव प्रभू व सतीश आचरेकर यांच्यात स्टॉल जागेवरून आधीपासून वाद असून बंदर जेटी किनाऱ्यावर काल रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौरव प्रभू यांनी सतीश आचरेकर यांच्या स्टॉलच्या नजीक आपला स्टॉल उभारण्यासाठी बांबू लावण्याचे काम सुरू केले होते. याबाबतची माहिती कळताच त्याठिकाणी हजर झालेल्या सतीश आचरेकर यांने त्यास विरोध केल्याने झालेल्या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाली. तर गौरव प्रभू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सतीश आचरेकर यांने शिवीगाळ करत काठीने मारहाण करून दुखापत केल्याचे म्हटले आहे. तर आचरेकर गटातर्फे मोहिनी रामचंद्र आचरेकर यांनी गौरव प्रभू, चंद्रकांत प्रभू यांच्या विरोधात तक्रार दिली आहे . या दोन्ही तक्रारींवरून सतीश आचरेकर, आनंद आचरेकर व अन्य पाच ते सहा जण तसेच गौरव प्रभू, चंद्रकांत प्रभू व अन्य ६ जण यांच्यावर गैर कायदेशीर जमाव करून शिवीगाळ व मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यातील गंभीर जखमी गौरव प्रभू व चंद्रकांत प्रभू यांच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण हे अधिक तपास करत आहेत,

You cannot copy content of this page