मालवण दि प्रतिनिधी
प्रत्येक भाषा ही तिच्या बोली भाषेतून आलेल्या म्हणी आणि वाकप्रचारातून समृद्ध होत असते. राजभाषा असलेल्या मराठीलाही बोली भाषेनेच समृद्ध केले आहे. भाषा आणि बोलीभाषा यांच्यातून आलेल्या शब्दांमध्ये अनेक अर्थ दडलेले असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी सूक्ष्मपणे अभ्यास करावा. पुस्तकातील वाचलेले आपल्या कायम स्मरणात राहते. वाचलेले एखादे पुस्तकही आपले आयुष्य बदलून टाकू शकते म्हणून विद्यार्थ्यांनी सतत पुस्तकाच्या सानिध्यात राहावे असे प्रतिपादन कोमसापचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी येथे बोलताना केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण येथे कोमसाप शाखा मालवणच्या सहकार्याने साहित्यिक आपल्या भेटीला भाग १ या कार्यक्रमांतर्गत मालवणचे साहित्यिक आणि कोमसाप मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश ठाकूर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘म्हणींचे मूळ आणि वाकप्रचारांचे कुळ’ असा अनोखा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे श्री. सुरेश ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती पूजन करून व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे लोकल कमिटीचे खजिनदार श्री. जॉन नरोना, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वामन खोत, पर्यवेक्षक श्री. एच. बी. तिवले, सहाय्यक शिक्षक श्री. आर. डी. बनसोडे, ग्रंथपाल श्री. प्रफुल्ल देसाई, सहाय्यक शिक्षिका कु. सुनंदा वराडकर, सौ. संजना सारंग, श्री. आर. बी. देसाई, श्री.अरविंद जाधव आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक वामन खोत यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. तर उपस्थित पाहुण्यांचा परिचय सहाय्यक शिक्षिका कु. सुनंदा वराडकर यांनी करून दिला. यावेळी सुरेश ठाकूर यांचा जॉन नरोना यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री ठाकूर यांनी जगात ७११७ भाषा असून भारतात १२१ भाषा आहेत. त्यात राजभाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेसारख्या २२ भाषा आहेत. या भाषांचा अभ्यासक बनणे गरजेचे आहे. पुस्तकांच्या वाचनामुळे माणूस समृद्ध बनतो हे लक्षात घेऊन वाचन संस्कृतीच्या चळवळीत सर्वानी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात सुरेश ठाकूर यांनी मराठी भाषेतील प्रचलित म्हणी आणि वाकप्रचारांचे अर्थ आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना समजावून सांगताना शाहीर साबळे यांच्या म्हणी आणि वाकप्रचारांवर आधारित असणारे गाणे गात विद्यार्थ्यांनाही या गाण्यात सहभागी करून घेतले. तर श्री. नरोना यांनीही वाचनाचे महत्व विशद केले. शेवटी आभार सौ. सारंग यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
