जि. प. शाळांमध्ये कुणकेश्वर-कातवन प्रथम; खासगी शाळांत हिर्लोकच्या शिवाजी विद्यालयाचा डंका..
⚡ओरोस ता ७-: राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सिंधुदुर्गातील सहा शाळांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे. जिल्हा परिषद आणि खासगी माध्यमिक शाळांच्या गटात प्रत्येकी तीन शाळांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला असून, विजेत्या शाळांना अनुक्रमे ११ लाख, ५ लाख आणि ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या गटात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर-कातवन शाळा क्रमांक १ हिने प्रथम क्रमांक मिळवून ११ लाख रुपयांचे बक्षीस पटकावले. मांडखोल-धवडकी क्रमांक २ शाळेने द्वितीय क्रमांक मिळवून ५ लाख रुपये, तर वेंगुर्ला तालुक्यातील मठ क्रमांक २ शाळेने तृतीय क्रमांक मिळवून ३ लाख रुपयांचे बक्षीस मिळविले.
खासगी माध्यमिक शाळांच्या गटात शिवाजी विद्यालय, हिर्लोक हिने प्रथम क्रमांक मिळविला. श्रीराम मोरेश्वर गोगटे एम. व्ही. विद्यालय, जामसंडे हिने द्वितीय, तर मिलाग्रीस हायस्कूल हिने तृतीय क्रमांक पटकावला. या शाळांनाही अनुक्रमे ११ लाख, ५ लाख आणि ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे.
जिल्हा परिषद सभेत विजेत्यांचा गौरव
शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या यशस्वी शाळांतील शिक्षक, संस्थाध्यक्ष आणि शालेय समिती अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती, सदस्य आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत विजेत्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
चौकट
शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, भौतिक सुविधा, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि लोकसहभाग यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील शाळांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटविली आहे.
