Headlines

माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रा…

भाजपच्या माध्यमातून आयोजन: विशाल परब संदीप गावडे यांची माहिती..

सावंतवाडी : राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नव्या पिढीला राष्ट्रभक्तीचा संस्कार देण्यासाठी माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात करण्यात आले आहे. १० ऑगस्ट रोजी उपरलकर देवस्थान येथून या यात्रेचा प्रारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थिती होणार असल्याची माहिती, भाजपचे युवा नेते विशाल परब व जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा संयोजक संदीप गावडे, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, प्रसन्न देसाई, शहराध्यक्ष नगरसेवक सुधीर आरीवडेकर, सुहास गवढंळकर , रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्या शोभा गावडे, पप्पू परब आदी उपस्थित होते. यावेळी भाजपचे युवा नेते श्री. परब म्हणाले , येत्या सोमवारी दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. उपरलकर देवस्थान येथून भव्य तिरंगा रॅलीला प्रारंभ होणार आहे‌‌. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली देशप्रेम जागृत केलं जाणार आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी सैनिक, देशप्रेमी, भाजपचे सर्व मान्यवरांचा समावेश त्यात असणार आहे. या रॅलीचा आगमन ११ वा. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे होणार आहे. यावेळी माजी सैनिकांचा सन्मान, भारत माता जयघोष होणार आहे. तर पाच ठिकाणी विशेष तिरंगा सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. तसेच माध्यमिक शाळांसाठी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेच आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी मतदार संघाची तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा संयोजक संदीप गावडे म्हणाले, देशाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकवर्षी राष्ट्रीय सण म्हणून स्वातंत्र्य दिन देशभरात साजरा करण्यात येतो. तिरंगा यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात १४ मंडळ असून सर्वांच्या संयोजनाखाली संपूर्ण जिल्हाभरात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तसेच शहीद स्मारक, वीर स्तंभ आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून वंदन केलं जाणार आहे. १० ते १३ ऑगस्ट पर्यंत यात्रा होणार असून १३ ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे. न भूतो न भविष्यती अशी ही यात्रा होणार असून यामध्ये देशप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page