विश्वनाथ नाईक ः लसीकरण पूर्णपणे निर्धोक, जनजागृतीची गरज
⚡बांदा ता.२८-: लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. परंतु अद्याप काही गाभण जनावरांच्या पशुपालकांमध्ये लसीकरणाबाबत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांची भीती दूर करत लसीकरणासोबत जनावरांचा विमा धोरण एकत्रित राबविण्याची मागणी पाडलोस सहकारी सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सिंधुदुर्गात रोगाचा शिरकाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम पशुसंवर्धन विभागाने सुरू केली आहे. पशुपालकांचा लसीकरणास कोणताही विरोध नसून गाभण जनावरांची चिंता सतावत आहे. गावात शेतकरी वर्गातील पशुपालकांकडे आठ ते पंधरा जनावरे असून सर्वांचा विमा उतरविणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने लसीकरणासोबत जनावरांचा एकत्रित विमा उतरविण्याची मागणी श्री.नाईक यांनी केली आहे.
पशुपालकाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण सर्पदंश होऊन मृत पावलेल्या जनावरांची प्रशासनाकडून कोणतीही भरपाई मिळत नाही. आर्थिक परिस्थितीत हलाखीची असल्याने शेतकऱ्यास जनवरांचा विमा उतरविणे शक्य होत नाही. त्यामुळे लसीकरणासोबत विमा धोरण व जनावरांच्या सशक्तीकरणावरही भर देण्याची मागणी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी केली आहे.
दरम्यान, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई यांच्या संपर्क साधला असता आत्तापर्य़ंत लसीकरण केलेल्या गाभण जनावरांना त्रास झालेला नाही. त्यामुळे लसीकरण निर्धोक आहे. जनावरांबाबत विमा योजना सद्यस्थितीत नाही. वैयक्तिस्वरुपात पशुपालकांनी जनावरांचा विमा उतरावा असे, श्री.देसाई यांनी सांगितले.
