Headlines

चिरे-रेती वाहतूक वादावर तोडगा काढणार..

निलेश राणेंचे आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.२८-: चिरे, रेती आणि खडी वाहतूक करणाऱ्या ट्रक व्यवसायिक व सिंधुदुर्गतील चिरेखाण व्यवसायिक यांच्यात नुकतेच काही मतभेद झाले होते. यामुळे दोन्ही ठिकाणी संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती असताना शिवसेना नेते, कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या प्रश्नावर आठ दिवसांच्या आत सर्व संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. गोवा येथे त्यांनी पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकाराने त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हे आश्वासन दिले. यावेळी गोवा व सिंधुदुर्ग येथील व्यवसायिक देखील उपस्थित होते. गोवा राज्यातील ट्रक असोसिएशनच्या तर्फे आमदार निलेश राणेंना निवेदन सादर करण्यात आले.

या महत्वपूर्ण बैठकीत गोव्यातील ट्रक, रेती, चिरे आणि खडी व्यवसायिकांनी सिंधुदुर्गात माल आणताना आकारले जाणारे वाढीव दर, विविध शुल्क आणि त्यामुळे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडेनासा झाल्याची व्यथा मांडली. अनेक ट्रक मालकांनी वाढत्या खर्चामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याचे सांगत शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. तसेच जांभा दगड चिऱ्यांचा भाव हा अधिक असल्याचे सांगितले. यावेळी निलेश राणे यांनी गोवा आणि सिंधुदुर्गचे नाते अनेक वर्षांपासून अतूट आहे. आई-मावशीच हे नातं असून आर्लेकर आणि राणेंचे मैत्रीचे संबंध आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांना न्याय मिळेल, असा समन्वय साधण्याचा आम्ही प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला. रेती, चिरे आणि खडी व्यवसायासंदर्भातील सर्व प्रश्न संबंधित व्यावसायिक, संघटना आणि प्रशासनाशी चर्चा करून सोडविले जातील. आठ दिवसांच्या आत सिंधुदुर्गातील रेती व खाण व्यवसायिकांची स्वतंत्र बैठक घेऊन सर्व बाजू समजून घेत योग्य निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि दोन्ही राज्यांतील व्यावसायिकांचे हित जपणारा तोडगा काढला जाईल असा शब्द दिला.

या बैठकीत गोवा ट्रक व्यावसायिकांनी भुमिका मांडली‌‌. सिंधुदुर्गात माल आणताना अतिरिक्त दर आकारले जात असल्याने गोव्यातील व्यवसायिकांना स्पर्धा करणे कठीण झाले आहे. स्थानिक व्यावसायिकांकडे स्वतःच्या खाणी, वाहने आणि इतर सुविधा असल्याने त्यांना व्यवसाय करणे शक्य होते. मात्र, गोव्यातील ट्रक मालकांसाठी हा व्यवसाय दिवसेंदिवस तोट्याचा ठरत असून अनेकांनी व्यवसाय बंद केला आहे. संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधत सांगितले की, हा केवळ व्यवसायाचा प्रश्न नसून शेकडो ट्रक मालक, चालक आणि त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. त्यामुळे या समस्येवर तातडीने न्याय्य तोडगा काढावा अशी मागणी केली.

यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले की, या विषयावर यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीतही बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर काही कारणांमुळे प्रश्न कायम राहिला. ट्रक व्यवसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्याशी थेट संपर्क साधला आणि तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली. गोव्यातील ट्रक व्यवसायिकांना न्याय मिळावा, त्यांचा व्यवसाय टिकून राहावा आणि गोवा–सिंधुदुर्गमधील व्यापार सुरळीत सुरू राहावा, हा आमचा उद्देश आहे. आमदार निलेश राणे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच सर्वांना मान्य होईल असा तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनीही व्यक्त केला.

या बैठकीत दोन्ही राज्यांतील व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यावर, वाहतूक व्यवसायातील अडथळे दूर करण्यावर आणि ट्रक व्यवसायिकांच्या हिताचे निर्णय घेण्यावर एकमत झाले. उपस्थित व्यवसायिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या पुढाकाराचे तसेच आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनाचे स्वागत करत लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार निलेश राणे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गोव्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शेट्ये तसेच सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page