⚡मालवण ता.२८-: जबाबदार पर्यटन ही संकल्पना सर्व पर्यटन व्यावसायिक, स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांनी अंमलात आणणे गरजेचे आहे, त्या माध्यमातून स्थानिक संस्कृती, निसर्ग, पर्यावरण, यांचे संवर्धन होईल, असे प्रतिपादन मालवण तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगर समन्वयक निखिल नाईक, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सुधीर धुरी, नंदन देसाई, शैलेश सामंत, प्राचार्या डॉ. सामंत, प्रा. बी. एच. चौगुले, अमेय देसाई, प्रा. एच. एम. चौगले, प्रा. हसन खान, मृणालिनी देसाई आणि रोहित आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी प्रास्ताविकात पर्यटन सप्ताहाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. प्रा. बी. एच. चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आपल्या संदेशात या पर्यटन सप्ताहासाठी शुभेच्छा दिल्या. पर्यटन सप्ताहाच्या समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी सप्ताहातील सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. तसेच मालवण मधील पर्यटन व्यावसायिकांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीतील नोकऱ्या व प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब पंतवालावलकर यांनी पर्यटनाची विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यानी पर्यटन व्यवसायातील संधींचा लाभ घ्यावा, असे मत व्यक्त केले.
या उद्घाटन सत्रानंतर “मी धामापूर तलाव बोलतोय” या डॉक्युमेंटरी फिल्मचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी प्रा. हसन खान यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जैव विविधता, खडक रचना, पाणथळ जमिनींचे महत्व अधोरेखित करत, जबाबदार पर्यटनाची संकल्पना कोणकोणत्या मार्गांनी प्रत्यक्षात आणता येईल याची उदाहरणे दिली. मृणालिनी देसाई यांनी धामापूर तलावाला रामसर दर्जा मिळवण्यासाठी केलेल्या अथक संघर्षाची माहिती दिली. रोहित आजगावकर यांनी स्वतः तयार केलेल्या व पारंपरिक ज्ञानावर आधारित खाद्य उत्पादनांची इको स्टोअरची केस स्टडी सादर केली आणि जबाबदार पर्यटनासाठी अशी कोणकोणती उत्पादने तयार करता येऊ शकतात त्यांची माहिती दिली.
प्रा. संग्रामसिंह पवार यांनी आभारप्रदर्शन केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, भौतिकशास्त्र विभाग आणि रसायनशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघटना पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थित होते.
