२७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब;:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय प्रारंभ
⚡ओरोस ता २८-: देशाला पोलिओमुक्त दर्जा मिळाला असला तरी हा मान कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी (ता. २८) सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली. उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यंदा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांपर्यंत लसीकरण पोहोचविण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने निश्चित केले आहे.
शुभारंभ कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन केले. पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेसाठी जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे, ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. तसेच २४९ उपकेंद्रे, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
दुर्गम भागातील, स्थलांतरित कुटुंबांतील तसेच वीटभट्ट्या आणि बांधकामस्थळांवरील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत, यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन केले.
फोटो ओळ: कणकवली:
