संविधान बचाव पदयात्रेला मालवणातून प्रारंभ

⚡मालवण ता.२५-: देशात वाढत चाललेल्या धार्मिक, जातीय द्वेष व त्यातून घडणाऱ्या समाजविघातक घटनांच्या विरोधातील रोष व निषेध व्यक्त करण्यासाठी संविधाननिष्ठ भारतीय अभियान अंतर्गत सिंधुदुर्गातील विवेकी विचारांच्या व्यक्ती मिळून काढण्यात येत असलेल्या संविधान बचाव पदयात्रेचा आज मालवणातून प्रारंभ झाला. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे असलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकास अभिवादन करून संविधान बचाव पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेत बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.

मालवण येथील फोवकांडा पिंपळ येथून या संविधान बचाव पदयात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी ग्रामीण रुग्णालय येथे असलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून व ‘खरा तो एकची धर्म या गीताचे सादरीकरण करण्यात आले. तर लहान मुलांनी आत्महत्येवर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले तसेच संविधानाबाबतच्या जागृतीचा पोवाडा सादर केला. वैभव वळंजू याने ‘सोडवा संविधान’ हे प्रबोधनात्मक गीत सादर केले. यानंतर मालवण बंदरजेटी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मालवण भरड नाका येथेही प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यानंतर कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ही पदयात्रा पुढील चौकेच्या दिशेने मार्गस्थ झाली. चौके, साळेल, कट्टा येथे संविधान बचाव पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. कट्टा येथे ही यात्रा मुक्कामासाठी थांबली.

या संविधान पदयात्रेतून ७५ किमीचा पायी प्रवास केला जाणार आहे. यात्रा २८ रोजी कुडाळ मुक्कामी असणार आहे. २८ रोजी कुडाळ येथे संविधान बचाव पदयात्रा पोहचल्यानंतर त्या पदयात्रेत कणकवली व देवगड येथून आलेले नागरिक सहभागी होतील. ३० रोजी वेंगुर्ला मुक्काम, १ रोजी शिरोडा मुक्काम व २ आक्टोबर रोजी शिरोडा सत्याग्रह स्मृतीस्थळ येथे संविधान बचाव पदयात्रेचा समारोप होणार आहे. २ आक्टोबर रोजी शिरोडा स्मृतीस्थळ येथे कॉ. मेणसे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.

या पदयात्रेत नितीन वाळके, दत्ता पई, नंदकिशोर तळाशीलकर, सरदार ताजर, यशवर्धन राणे, विवके राजमाने, स्वाती पारकर, मनीषा पारकर, संजय शिंदे, ऐश्वर्य मांजरेकर, मीना घुर्ये, चिन्मया चव्हाण, संचिता कांदळकर, वैभव वळंजू, संपदा मांजरेकर, महेश अंधारी, सिद्धार्थ जाधव, साईनाथ चव्हाण, जेम्स फर्नांडिस, सुरेश ठाकुर, रुजारिओ पिंटो, सुहास ओरसकर, रवींद्र तळाशीलकर, विठ्ठल साळगावकर, पी. के. चौकेकर, रंजन तांबे, संग्राम कासले, चारुशिला देऊलकर, गौरव ओरसकर, गार्गी ओरसकर, उषा यमकर, जयमाला मयेकर आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page