ऑनलाईन फसवणूकीपासून सावध रहा

पोलीस निरीक्षक विजय यादव

⚡मालवण ता.२७-: मालवण तालुक्यात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाईन फसवणूकीपासून सावध रहावे, असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी केले आहे.

फेसबुकवरील वाहन विक्री व खरेदी, लोन, स्किम व शेअर मार्केटबाबत फसवणूक तसेच ऑनलाईन व्हिडीओ रेकॉर्डींग करून व्हिडीओ व्हायरल बदनामीची भिती दाखवून पैशाची मागणी करणे, इन्स्टाग्राम व्हॉटसअप चॅटींगद्वारे जाहिरातीद्वारे आमिष दाखवून फसवणूक करणे, वीज कनेक्शन बंद होणार असे मॅसेज करून फोन नंबर देऊन त्याद्वारे फसवणूक करणे, एनी डेस्क, टीम व्ह्यूवर यासारखी अँप डाऊनलोड करायला लावून मोबाईलमधील डाटा चोरून अकाऊंटमधील पैसे काढणे, बँक केवायसी अपडेट करायचे आहे, असे सांगून ओटीपी मागून घेऊन अकाऊंटमधील पैसे काढून घेणे, लॉटरी लागली आहे अशी लिंक पाठविणे व त्याद्वारे फसवणूक करणे, लोनची ऑफर देऊन मॅसेज किंवा लिंक पाठवून फसवणूक करणे अशा विविध माध्यमातून लोकांची फसवणूक सुरू असून लोकांची आर्थिक फसवणूक होत आहे. फसवणूक करणारे लोक हे देशाबाहेरील तसेच बोगस ओळखपत्रांचा वापर करून फसवणूक करत असतात. तरी नागरिकांनी कोणत्याही अनोळखी मॅसेजवर क्लिक करू नये तसेच फेसबुक व्हॉटसअप व इन्स्टाग्राम व सोशल मिडीयावरील आमिषांच्या अनोळखी जाहिरातींना बळी पडू नये व स्वतःची आर्थिक फसवणूक टाळावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page