खा.अरविंद सावंत;शिवसेना नेते अरविंद सावंत यांचा कुंभवडे ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
⚡कणकवली ता.१८-: आपल्या गावातून आपल्या माणसांकडून होणारे कौतुक, सत्कार हे आपलेपणाची जाण निर्माण करतात.जीवनात प्रेरणा देतात म्हणून आपल्या माणसांची कौतुकाची थाप नेहमीच मलाच नाही तर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असेल.असेच एकत्र या, एकमेकांना सहकार्य करा, विशेष करून कुंभवडे गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास घडवूयात,असे प्रतिपादन शिवसेना नेते खा. अरविंद सावंत यांनी केलं.
कुंभवडे गावचे सुपुत्र, शिवसेना नेते, शिवसेना मुख्य प्रवक्ते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल कुंभवडे ग्रामस्थ आणि कुंभवडे ग्रामविकास संस्था, मुंबई यांच्या वतीने नुकताच कुंभवडे येथे जाहीर नागरी कुंभवडे सरपंच आप्पा तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर आप्पा सावंत, लक्ष्मण सावंत, अरविंद सुतार, पी. एम. सावंत, प्रमोद सावंत, पंढरीनाथ सावंत, विजय सावंत ,गुरू पेडणेकर इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी कुंभवडे ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण(भाई) सावंत यांनी खासदार अरविंद सावंत यांच्या कार्याचा गौरव करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार होणारे निष्ठावंत, कडवट, सच्चा शिवसैनिक कसे असतात. हे अरविंद सावंत यांनी सतत दाखवून दिलेले आहे. आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीत ईडीच्या भीतीने किंवा खोक्यांसाठी लगेच नॉट रीचेबल होणारे गद्दार मंत्री,आमदार, खासदार आपण बघतोय आणि पक्ष प्रमुखांनी, पक्षाने आदेश देताच केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा दिला. अरविंद सावंत यांच्याकडे पाहिल्यानंतर उर अभिमानाने भरून येतो. अभिमान वाटतो असे रत्न हे आपल्या गावातील, आपल्या मातीतील, आपल्यातील आहे याचा गर्व वाटतो. आपल्या शिवसेना या पक्षाशी एकनिष्ठ राहून सतत समाजकारण,राजकारण करणाऱ्या आपल्या भाईंवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाची मोठी जबाबदारी दिली आहे.याप्रसंगी मोठ्या संख्येने कुंभवडे ग्रामस्थ उपस्थित होते.
