वेंगुर्ले किनारपट्टीवर डांबर सदृश्य गोळे

तेलवाहू जहाज फुटल्यामुळे हा प्रकार नसल्याचे वसंत तांडेल यांचा दावा

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डांबर सदृश्य गोळे आढळून येत आहेत. परंतु, हा प्रकार विजयदुर्ग समुद्रात बुडलेल्या तेलवाहू बोटीमुळे झालेला नाही. कारण, किना-यावर समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसत नसल्याची माहिती मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिली. मात्र, या डांबर सदृश्य पदार्थामुळे मच्छिमारांना थोडा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

  दुबईहून बेंगलोरच्या दिशेने जाणारे ‘पार्थ‘ हे तेलवाहू जहाज सिधुदुर्ग जिह्यातील विजयदुर्ग जवळ बुडाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या बुडालेल्या बोटीतील तेलामुळेच किना-यावर डांबरासारखे काळे थर दिसत असल्याचे बोलले जात होते. परंतु, याबाबत स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधला असता दरवर्षी असे काळे थर येत असल्याचे त्यांनी सांगितले. खोल समुद्रातून वाहून येणा-या क्रुज ऑइलची गळती होत असते. त्यामुळे ते काळसर ऑईल पाण्याबरोबर वाहत वाहत किना-यापर्यंत येते. समुद्राचे खारे पाणी आणि उष्णता यांच्यामुळे या ऑईलचे डांबरासारखे गोळे किना-यावर दिसतात. यापासून कोणताही धोका नसल्याचे वसंत तांडेल यांनी सांगितले. तर वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरस्कर यांनी याला दुजोरा दिला आहे.
You cannot copy content of this page