आईनंतर मुलाचाही महिनाभरातच दुर्दैवी अंत

⚡सावंतवाडी ता.१७- : तालुक्यातील मळगाव रेडकर वाडी येथील रहिवाशी व सुहाना मसाला कंपनीचे गोवा विभाग प्रमुख महेंद्र मोहन रेडकर (वय ३३) यांचे गोवा बांबोळी रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले आहे. चार दिवसांपूर्वी १३ सप्टेंबर रोजी म्हापसा (गोवा) येथे त्यांच्या दुचाकीला बसने पाठीमागून दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. महिनाभरापूर्वी १० ऑगस्ट रोजी त्यांच्या आईचेही निधन झाले होते. त्यामुळे आई पाठोपाठ तरुण मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मळगाव रेडकरवाडीतील महेंद्र रेडकर हे आपल्या कंपनीच्या कामासाठी १३ सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या दुचाकीने गोवा म्हापसा येथे निघाले होते. म्हापसा बाजारपेठेत त्यांची काही वितरकांसोबत मिटींग होणार होती. तत्पूर्वी म्हापसा न्यायालयासमोर असलेल्या उतारावर ते आपल्या दुचाकीने जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या खाजगी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत झालेल्या अपघातात ते रस्त्यावर कोसळले. तरीही बस चालकाला बसवर ताबा मिळवता न आल्याने बससोबत फरफटत जाऊन गाडीचे पुढील चाक त्यांच्या अंगावर चढले. त्यामुळे या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

अपघातानंतर तशाच अवस्थेत त्यांनी याबाबतची कल्पना आपल्या म्हापसा येथील कंपनीच्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर कंपनीच्या सहकाऱ्यांनी त्यांना लगेच म्हापसा येथील अजिलो रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारार्थ त्यांना बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले अखेर बुधवारी रात्री त्यांच्या पोटावर अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर ते शुद्धीत आले नाहीत. गेले तीन दिवस ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. अखेर शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
महेंद्र रेडकर यांच्या पश्चात वडील, भाऊ, भावजय, पत्नी व दीड वर्षाची मुलगी असा परिवार आहे. महेंद्र हेच घरचे मुख्य आधारस्तंभ होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तथा सिंधू मित्र फाउंडेशनचे कार्यकर्ते भगवान उर्फ दाजी रेडकर यांचे ते बंधू होत.

दरम्यान, संबंधित बस चालकावर म्हापसा येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

You cannot copy content of this page