⚡कणकवली ता.१७-: जागतिक चालक दिन तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव टोल नाक्याजवळ रस्ते वाहतूक महामार्ग पोलीस, ट्राफिक पोलीस तसेच ओसरगावच्या ग्रामस्थांच्यावतीने ट्रक चालकांचा सत्कार करण्यात आला व पाणी व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी रस्ते वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, रामचंद्र गोसावी,ओसरगावचे माजी उपसरपंच व कायम अपघात प्रसंगी मुंबई गोवा हायवेला मदत करणारे चंद्रहास उर्फ बबली राणे, पोलीस कर्मचारी वेंगुर्लेकर, सावंत व सर्व ट्राफिक पोलीस व महामार्ग पोलीस व ट्रक चालक व ओसरगाव ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी ट्रक चालकांना टोल नाक्याजवळ मार्गदर्शन केले. गाडी चालवताना खबरदारीचे उपाय म्हणून मद्यपान न करणे, वाहन सावकाश चालवणे, वाहन चालवताना सर्व अटी शर्ती नियमाचे पालन करणे याचे विस्तृत मार्गदर्शन केले. त्यामुळे उपस्थित वाहन चालकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले व वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले. काही वाहन चालकांना आज जागतिक चालक दिन आहे याची वाहन चालकांना कल्पनाही नव्हती. हजारो किलोमीटरचा प्रवास करून इच्छित स्थळी मालाची सुरक्षित ने आण करतात, म्हणून वाहतूक पोलिसांच्यावतीने व ग्रामस्थांच्या वतीने आगळावेगळा कार्यक्रम सर्वांच्या समोर करण्यात आला.
जागतिक चालक दिनानिमित्त
ओसरगाव येथे ट्रक चालकांचा केला सत्कार
