मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार; कामगारांचा इशारा
मालवण दि प्रतिनिधी
मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आज अचानक बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. गेल्या दोन महिन्यात ठेकेदाराने ठरविलेल्या पगाराप्रमाणे पगार न दिल्याने व पगारात वाढ न करणे, हँड ग्लोव्हज, मास्क, पीपीटी किट, ड्रेसकोड न देणे व इतर मागण्यांसाठी आज अचानक मालवण नगरपालिकेच्या सतरा पैकी पंधरा कंत्राटी सफाई कामगारांनी बेमुदत आंदोलन पुकारले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहील अशी माहिती संबंधित कंत्राटी कामगारांनी दिली आहे.
या संबंधीचे अधिक वृत्त असे की, मालवण शहरात नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कायमस्वरूपी अठरा सफाई कामगार असले तरी प्रत्यक्षात त्यातील काहीजन कामावर हजर होतात त्यामुळे शहरातील कचऱ्याची उचल होणे अवघड होते. मालवण शहरात होणारा कचऱ्याचा निपटारा करण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेने गेल्या काही वर्षापासून कंत्राटी पद्धतीने सफाई कामगार नियुक्त केले आहेत.
जून २०२२ मध्ये मालवण नगरपालिकेने सतरा सफाई कामगारांचा ठेका एका कंपनीला दिला. हा ठेका देताना सतरा कामगारांना प्रतिदिन ४२५ रुपयाप्रमाणे वेतन देण्याचे ठरविले. त्यानुसार जून २०२२ चा पगार ठेकेदाराने त्या सतरा कामगारांना दिला. मात्र, जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा पगार ठेकेदाराने ठरलेल्या वेतनाप्रमाणे न दिल्याची माहिती संबंधित कंत्राटी कामगारांनी दिली असून ठेकेदारा विरोधात त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही नाराजी व्यक्त करतानाच पंधरा दिवसापूर्वीच त्या कंत्राटी सफाई कामगारांनी ठरल्याप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच ते वेळेवर देण्यात यावे त्याचप्रमाणे पगारात वाढ व्हावी तसेच मास्क हॅन्ड ग्लोव्हज, पीपीटी किट, ड्रेस कोड, आदी व इतर साहित्य पुरवावे अशा आशयाच्या मागण्या या कंत्राटी सफाई कामगारांनी केल्या होत्या असे समजते मात्र, या मागण्यांकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले गेले.
आज मालवण नगरपालिकेच्या सतरा पैकी पंधरा कंत्राटी सफाई कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन केले. आपले हे आंदोलन ठेकेदाराने आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास बेमुदत सुरू राहील अशी माहिती संबंधित कंत्राटी सफाई कामगारांनी दिली आहे.
