लवकरच निकाल जाहीर करणार
⚡मालवण ता.१४-: गणेश चतुर्थी निमित्त माजी गृहमंत्री व जिल्हा काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा कमिटी तर्फे प्रत्येक तालुक्यात
गणपती आरास सजावट स्पर्धा घेण्यात आली. काँग्रेस जिल्हा कमिटी व मालवण तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मालवण तालुक्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून तालुक्यतील ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पर्धकांच्या घरी जाऊन सजावटीचे परीक्षण केले असून या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ही स्पर्धा शुक्रवार दि. २ सप्टेंबर ते सोमवार १२ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात तालुका निहाय घेण्यात आली. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी स्पर्धेचे नियोजन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या घरातील गणपती आरास सजावटीचे, व चलचित्र यांचा व्हिडीओ बनवून काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पाठविला होता. त्यानुसार मालवण तालुक्यातून ३० व्हिडीओ प्राप्त झाले. त्यानुसार स्पर्धेचे जिल्हा समन्वयक अरविंद मोंडकर त्यांसोबत मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण चे सदस्य योगेश्वर कुर्ले, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, पल्लवी तारी- खानोलकर, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर यांनी काही ठिकाणी जाऊन परीक्षण केले. या स्पर्धेतील काही उत्तमरीत्या संदेश देणाऱ्या साकारलेल्या सजावटीस, चलचित्र यांमधून नंबर काढण्यात येणार असून लवकरच काही दिवसात विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धक विजेत्यांना बक्षीस वितरण तारीख व स्थळ लवकरच कळविण्यात येईल, असेही मेघनाद धुरी यांनी म्हटले आहे.
